वृक्षलागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:11+5:302021-06-06T04:21:11+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची ...
मंगल जीवने
बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्षलागवडीची आठवण होऊ लागली आहे. कारण वृक्ष पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत. कारण ती वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. त्यामुळे वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन बल्लारशाह वनपरिक्षेत्रात ५० कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत मागील चार वर्षांत अंदाजे १० लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन उभे असून, पर्यावरणाचा समतोल राखत आहे.
बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कारवा, कळमना, उमरी, मानोरा व बल्लारशाह या पाच बिटात दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतो. यामध्ये विविध मिश्र प्रजातींचे रोपवन नर्सरीत तयार करून लावण्यात येते.
मागील चार वर्षांत बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मानोरा उपक्षेत्रात ३ हजार ९०० हेक्टरवर २ लाखांच्या जवळपास विविध प्रजातींचे रोपवन तयार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर यांनी दिली.
बॉक्स
वनकर्मचारी सांगतात...
बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील रोपवनाबाबत सांगताना क्षेत्र सहायक भोवरे म्हणाले, जिथे वन आहे तिथे जीव आहे. अलीकडे कोरोनाकाळात प्राणवायू विकत घेण्याची वेळ आली आहे. याला पर्याय वृक्ष संवर्धनाचा आहे. आणि आम्ही वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करीत आहोत. उमरी वनपरिक्षेत्राचे प्रवीण बिपटे यांनी वृक्षलागवडीची माहिती देताना सांगितले की मिश्र प्रजातींचे रोपवन आता बहरले आहे. कळमनाचे क्षेत्र सहायक पुरी व कारवाचे रुंदन कातकर यांच्या नर्सरीत लावलेल्या रोपवनाची संपूर्ण वाढ झाली आहे. बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील अधिकारी संतोष थिपे म्हणाले, त्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांना या वृक्षलागवडीचा निश्चितच फायदा होईल. गावशेजारी घेतलेल्या वृक्षलागवडीमुळे गावाच्या शोभेत भर पडते. गावाच्या जवळ जंगल उभे राहते. त्यामुळे गावकऱ्यांना प्राणवायू मिळण्यास मदत होते. तसेच वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीची धूप थांबेल.
वृक्षलागवड करताना वनाची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.