बाळापूर-तळोधी मार्ग ठरतोयं मृत्युपथ
By admin | Published: September 19, 2015 01:35 AM2015-09-19T01:35:23+5:302015-09-19T01:35:23+5:30
तळोधी - आरमोरी - गडचिरोली हा परिसरातील सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नियमीत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
तळोधी (बा) : तळोधी - आरमोरी - गडचिरोली हा परिसरातील सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नियमीत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र तळोधी-बाळापूर दरम्यान या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे व डाबंरी रस्त्याच्या कडेला एक दिड फुट खोलीचा भाग निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात दररोज एक ना एक अपघात घडत आहे. त्यामुळेच तळोधी- बाळापूर मार्ग हा मृत्युपथ ठरणार तर नाही ना, असा प्रश्न या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
तळोधी-बाळापूर या मार्गावर श्रीक्षेत्र गायमुख देवस्थान व रेल्वे स्थानक ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. तसेच बाळापूरच्या पुढे मेंडकी, गांगलवाडी, आरमोरी व गडचिरोली ही मोठी ठिकाणे असून या मार्गावर नियमीत दुचाकी, चारचाकी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बसेस धावतात. परंतु रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे व डांबरी रस्त्याच्या कडेला एक-दीड फूट खोलीची दरी यामुळे येथे वाहन चालकाला डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागते. थोडी जरी नजरचूक झाली तर वाहनाला अपघात ठरलेला आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित दुचाकी घसरून पडणे, दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर पडले, चार चाकी वाहन रस्त्याच्या खाली घसरणे यासारखे अपघात हे नियमित सुरू असतात व अशा प्रकारच्या अपघातात अनेक व्यक्ती जबर जखमीसुद्धा झाल्या आहेत.
यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. परंतु परिसरातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (वार्ताहर)