गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बाेलेराे आदळली; पती-पत्नीसह चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 06:36 PM2022-08-13T18:36:20+5:302022-08-13T18:36:44+5:30

Chandrapur News गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला.

Balera rams into parked truck in attempt to save cow; Four killed including husband and wife | गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बाेलेराे आदळली; पती-पत्नीसह चार ठार

गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बाेलेराे आदळली; पती-पत्नीसह चार ठार

Next

चंद्रपूर : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात चाैघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर किसाननगरजवळ शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झाला. मृतात पती, गर्भवती पत्नी, मेहुणा तसेच गडचिरोलीतील एकाचा समावेश आहे.

अनुप ताडूरवार (३५), त्याची पत्नी माहेश्वरी ताडूरवार (२५) दोघेही रा. विहीरगाव ता. सावली, माहेश्वरीचा भाऊ मनोज तीर्थगिरवार (२९) रा. ताळगाव जि. गडचिरोली, डीजे व्यावसायिक पंकज बागडे (२६) रा. गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र हरेंद्र मसराम (२३) रा. चिखली ता. सावली हा किरकोळ जखमी झाला आहे.

ताडूरवार कुटुंब, मेहुणा व मित्रासह एमएच-३३/ए-५२५७ क्रमांकाच्या बोलेरोने शुक्रवारी चंद्रपूर येथे खासगी कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री परत गडचिरोलीला येत होते. किसाननगर येथे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या बसला होता. तेथील गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात सीजी-०७/बीएस-७७४७ या क्रमांकाच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यात बोलेरो वाहनाचा चेंदामेंदा झाला. तर वाहनातील चारजण जागीच ठार झाले. घटनेची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार बोधे, नीलेश, स्वप्निल दुर्योधन, दर्शन लाटकर आदी करीत आहेत.

कुटुंबाचा आधारच हिरावला

एकुलता एक असलेल्या अनुप ताडूरवार यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. आईने मोलमजुरी करून त्याचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थितीतून सावरत अनुपने मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. अनुपची पत्नी माहेश्वरी ही तीन महिन्यांची गर्भवती होती. सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, शुक्रवारी दोघांवरही काळाने झडप घालून हिरावून नेले. अनुपला तीन वर्षीय मुलगा व वृद्ध आई आहे. अपघातात दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने मुलगा व वृद्ध आई पोरके झाले. या घटनेने विहिरगावात शोककळा पसरली आहे. तर गडचिरोली येथील पंकज बागडे हासुद्धा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. अनुप व पंकज दोघेही मित्र डीजे व्यवसायात जम बसवला होता. त्यांच्या निधनाने गडचिरोलीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेवारस जनावरांमुळे घडला अपघात

चंद्रपूर-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर नेहमीच बेवारस जनावरे बसून असतात. याच बेवारस जनावरांमुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. निरपराधांचा जीव गेल्याने प्रशासनाने तत्काळ बेवारस जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Balera rams into parked truck in attempt to save cow; Four killed including husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात