बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेसला हिरवी झंडी; लवकरच पुन्हा रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:55 PM2022-03-16T12:55:53+5:302022-03-16T13:24:11+5:30
१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटानंतर बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कायमस्वरुपी बंद झाली. त्यामुळे चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईला जाणे कठीण झाले होते. नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी सातत्याने मागणी रेटून धरल्यानंतर रेल्वेने आता बल्लारशाह- मुंबई ही ट्रेन थेट चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर तसेच परिसरातील नागरिकांना मुंबई जाण्यासाठी पूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेस होती. बल्लारशाह-वर्धा पॅसेंजरला मुंबईकडे जाण्यासाठी सहा डब्बे जोडले जात होते. नागपूरहून येणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेसला वर्धा येथे हे डब्बे जोडून मुंबईला जात होते. मात्र, कोरोनानंतर एक्स्प्रेस बंद झाल्या. यामध्ये मुंबईला जाण्यासाठी हक्काची सेवाग्राम एक्स्प्रेस कायमची बंद झाली. विशेष म्हणजे, रेल्वेने आता लिंक प्रणाली सुरू केल्यामुळे डब्बे जोडणे शक्य नाही.
दरम्यान, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजीमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रनिधींनी रेल्वे विभागाशी वारंवार पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन रेल्वे सुरू करण्याची मागणी रेटून धरली. त्यातच बल्लारशाह येथील पिटलाईनचे काम पूर्णत्वास आल्याने बल्लारशा-मुंबई या ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून बल्लारशाह येथून रात्री ९.३० वाजता दररोज ही ट्रेन मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांसह रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेनची मागणी करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार, बैठका घेऊन मागणी केली. आता या ट्रेनला हिरवी झंडी मिळाली असून, लवकरच ही ट्रेन सुरू होणार आहे.
- श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे