झाडीबोली साहित्य मंडळाच्या बल्लारपूर शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:54 PM2018-02-26T22:54:59+5:302018-02-26T22:55:11+5:30
झाडीबोली साहित्य मंडळाची शाखा बल्लारपूर येथे उघडण्यात आली. या शाखेचे उद्घाटन व त्याप्रसंगी बहारदार कवी संमेलन नुकतेच पार पडले.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : झाडीबोली साहित्य मंडळाची शाखा बल्लारपूर येथे उघडण्यात आली. या शाखेचे उद्घाटन व त्याप्रसंगी बहारदार कवी संमेलन नुकतेच पार पडले.
येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडोपत बोढेकर होते. उद्घाटक म्हणून ना. गो. थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून कला वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, मराठी शाखा प्रमुख प्रा. डॉ. रवी केवट उपस्थित होते. थुटे यांनी स्वलिखित पुस्तकांचा एक संच महाविद्यालयाला भेट स्वरूपात दिला.
झाडीबोली व झाडीपट्टीतील संस्कृती व त्यावर होत असलेले लिखाण यावर थुटे यांनी प्रकाश टाकले. अध्यक्षीय भाषणात बोढेकर यांनी, बोलीवर संस्कार होऊन भाषा तयार झाली आहे. बोली ही माता तर भाषा ही कन्या होय, अशा शब्दात झाडीबोली भाषेचे महत्त्व विषद करुन झाडीबोली संमेलनाचे कारण काय यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य शिंदे, वसंत खेडेकर, प्रा. केवट यांचीही भाषणे झालीत.
याप्रसंगी झालेल्या कवी संमेलनात खुशालदास कामडी, सु. वि. साठे, प्रियंका वाढई, अनिता कन्नाके, शितल पोहाणे, राजेश नगराळे, प्रा. स्वप्नील बोबडे, सुजिता पोहाणे, सुनील इखारे, प्राचार्य अर्चना ताजने, प्रा. खुशबू जोसेफ यांनी आपल्या कविता ऐकविल्या. संचालन प्रा. श्रावण बानासूरे यांनी केले.
यावेळी बल्लारपुरातील झाडीबोली साहित्य मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून प्राचार्य अनिल शिंदे, अध्यक्ष म्हणून प्रा. श्रावण बानासूरे, उपाध्यक्ष प्रा. खुशबू जोसेफ, सचिव प्रा. अर्चना ताजने यांची तर सदस्य म्हणून प्रा. स्वप्नील बोबडे, प्रियंका वाढई, शितल पोहाणे, अनिता कन्नाके यांची निवड करण्यात आली.