बल्लारपूरचे बसस्थानक ठरले राज्यभराचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:43+5:30
११ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बल्लारपुरातील बसस्थानक एखाद्या विमानतळासारखे दिसते. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था, आदींमुळे या बसस्थानकाला पंचतारांकित लूक प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर. औद्योगिक केंद्र असणारे हे शहर मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. आता या शहराची ओळख विमानतळासारखे बसस्थानक असणारे शहर म्हणून होत आहे. भव्यता, दिव्यता आणि नाविन्यता हा तिहेरी संगमच जणू या बसस्थानकात एकवटला आहे.
११ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बल्लारपुरातील बसस्थानक एखाद्या विमानतळासारखे दिसते. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था, आदींमुळे या बसस्थानकाला पंचतारांकित लूक प्राप्त झाला आहे. राज्यात कुठेही इतके आकर्षक बसस्थानक बघितले नसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. या बसस्थानकात दोन मोठ्या झाडांचा वापर रंगसंगतीच्या माध्यमातून करण्यात आला असून हे प्रवाशांसाठी सेल्फी पॉर्इंट ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असे तालुक्याचे बसस्थानक म्हणून बल्लारपूरचा नावलौकिक वाढत आहे.
या बसस्थानकासोबत जिल्ह्यातील इतर अनेक बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे.
चंद्रपूर, मूल, घुग्घूस, पोंभूर्णा या ठिकाणीही नवीन बसस्थानकांसाठी निधी मंजूर झाला आहे. कामेही झपाट्याने सुरू आहे. चंद्रपूर भव्य बसस्थानक लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहे.
कुठलाही बाहेरचा व्यक्ती शहरात आला की तो सर्वप्रथम बसस्थानकावर येतो. त्यामुळे हे आधुनिक बसस्थानक शहराला नवी ओळख देणार आहे, यात शंका नाही.
बल्लारपूरकरांनी, या शहरात एवढे सुंदर, देखणे, प्रशस्त, सोयीयुक्त बसस्थानक होईल, याची कधीच कल्पना केली नव्हती. स्वप्नवत वाटावा असा विकास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दिवसरात्र लक्ष दिले जाते. कुठे कचरा पडलेला दिसून येत नाही. भव्यता, सुंदरता, आणि स्वच्छतायुक्त असे हे बसस्थानक बल्लारपूर शहराचे वैभव आहे.
-श्रीकांत आंबेकर, बल्लारपूर
बल्लारपुरात नवीन एवढ्या मोठ्या बसस्थानकाची गरज काय, असे म्हणणारेच हे बसस्थानक तयार झाल्यानंतर त्याची योग्य बांधणी, भव्यता आणि देखणेपणा बघून खरेच सुंदर, छान असे म्हणताना दिसले.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपुरात विमानतळच असल्याचा भास होतो. बसस्थानकाचा देखणेपणा कायम राहावा, याची काळजी घेतली जात आहे, हेही महत्वाचे.
-घनश्याम बुरडकर, बल्लारपूर
इको-पार्कने वाढविली शहरांची सुंदरता
मूल शहराच्या मध्यभागी पंडित दिनदयाल उपाध्याय इको-पार्क उभारण्यात आले आहे. खनिज विकास निधी अंतर्गत निधी खर्चून बांधण्यात आलेल्या या इको पार्कमुळे मूल शहराच्या सौंदर्यात अधिक भर घातली गेली आहे. या इको पार्कमध्ये योगा प्लॅटफॉर्म, लक्ष्मण झुला, पॅगोडा, प्रवेशद्वार, चेक पोस्ट, वॉच टॉवर, उपहारगृह, संरक्षण कुटी, वॉटर बॉडी, वृक्षारोपण इत्यादी बाबींचा समावेश आहे. अतिशय आकर्षक व मनोवेधक पद्धतीने बांधण्यात आलेल्या सदर इको पार्कमुळे मूल शहरातील नागरिक, लहान मुले, मोठ्या संख्येने सदर इको-पार्कचा लाभ घेत असून हे स्थळ जनतेच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पर्यावरणाचा समतोल राखत पर्यावरण संवर्धनाचे उद्दीष्ट समोर ठेवून साकारलेले हे इको पार्क मूल शहराचे वैशिष्ट्य ठरले आहे. याशिवाय बल्लारपूर, पोंभूर्णा, अजयपूर या ठिकाणीही इको पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
बसस्थानक हे शहराची गरज आहे. बल्लारपुरातील नवीन बसस्थानक हे राज्यासाठी आदर्श ठरावे, असा आपला मानस होता. आता ते बांधून तयार झाले असून अगदी विमानतळ वाटावे, असे देखणे आहे. याशिवाय शहरात ज्येष्ठ नागरिक, बालगोपाल यांच्यासाठी नवे आधुनिक इको-पार्क असावे, असे आपणाला वाटायचे. त्यादृष्टीने मूल, चंद्रपूर, पोंभूर्णा येथे इको पार्क बांधण्यात आले आहे.
-सुधीर मुनगंटीवार,
पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.