बल्लारपूर विधानसभा क्षेत्र धूरमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:27 AM2018-06-29T00:27:18+5:302018-06-29T00:27:30+5:30
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. लवकरच १०० टक्के कुटुंबाना गॅस जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विसापूर येथे आयोजित एलपीजी गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मध्य चांदा वनविभागाच्या वतीने येथील कार्यक्रमात तब्बल ४८७ कुटुंबाना गॅस जोडणीचे वितरण केले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर मनपाच्या अध्यक्ष अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, मध्य चांदा वनविभागाचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. हरिश गेडाम, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जि. प. सदस्य वैशाली बुद्धलवार, पं. स. सदस्य विद्या गेडाम, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, रमेश पिपरे, दिलीप खैरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी इंगळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान लाभार्थी कुटुंबाना पालकमंत्र्यांच्या हस्ते गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक गजेंद्र हिरे, संचालन हेमंत शेंडे यांनी तर आभार सरपंच जिलटे यांनी मानले.
विसापूर परिसराला मिळणार वैभव
विकासात्मक कार्याला सातत्याने पुढे नेण्यासाठी विसापूर परिसरात बॉटनिकल गार्डन पूर्णत्वास येत आहे. सैनिक शाळाही आपल्या परिसराचे वैैभव वाढविणारी ठरणार आहे. २७ कोटी रुपये खर्चाचे तालुकास्तरीय क्रीडांगण साकारले जात असून या भागातील क्रीडापट्टूंना आॅलिम्पिक खेळासाठी संधी मिळणार असल्याचा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.