बल्लारपूर पहिला आरओयुक्त मतदार संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:04 PM2019-01-07T23:04:26+5:302019-01-07T23:04:43+5:30
बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. या मतदार संघातील १२५ गावांमध्ये आकर्षक प्रवासी निवारे बांधण्याचा संकल्प आपण केला असून पदमापूर आणि आगरझरी या गावांमध्ये पहिला प्रयोग आपण राबविला आहे. या मतदार संघातील सर्व अंगणवाड्या आय.एस.ओ. मानांकित करून त्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील बालकांना योग्य शिक्षण व संस्कार देण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने आगरझरी येथे १० लाख रू. निधी खर्चून आमदार निधीतून सामाजिक सभागृह बांधण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
चंद्रपूर तालुक्यातील पदमापूर आणि आगरझरी येथे रविवारी प्रवासी निवाºयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपाचे स्थायी समिती सभापती राहूल पावडे, जिल्हा परिषद सदस्या रोशनी खान, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमान काकडे, फारूक शेख, जयंत टापरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन बसवून त्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हा प्रयोग आता संपूर्ण मतदार संघात राबवत हा मतदार संघ देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल, असा आपला प्रयत्न आहे. प्रत्येक घरात एलपीजी गॅस उपलब्ध व्हावा व त्या माध्यमातून हा मतदार संघ धूरमुक्त ठरावा हा आपला संकल्प आहे. सर्व अंगणवाड्या आय. एस. ओ. मानांकित करून त्या माध्यमातून बालकांना सुसंस्कारित करण्याचा आपला मानस आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. पदमापूर आणि आगरझरी या दोन गावांमध्ये आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या प्रवासी निवा-यांचे लोकार्पण यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.