बल्लारपुरात आहेत नानाविध सेल्फीस्थळे, युवावर्ग आकर्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:17 AM2019-05-26T00:17:27+5:302019-05-26T00:18:03+5:30
स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात. बरेच शहर, गाव, खेड्यामध्ये अशी स्थळं आहेत. वर्धा नदी काठावरील बल्लारपूर या ऐतिहासिक शहरात सेल्फीकरिता नाना प्रकारची विविध स्थळ आहेत. जी सेल्फी प्रेमींना आवडतील, आवडत आहेत. वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपासून उभा असलेल्या किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी नदीच्या ऐन तिरावरील राणी महालातील आतील पंचकोनी भाग, नदीकडे उतरण्याकरिता असेलले प्रवेशद्वार आकर्षित करीत आहेत.
किल्याला लागूनच वर्धा नदीचे गणपती घाट प्रसन्नता देणारे सेल्फी स्थळ आहे. बारमाही वाहणारी वर्धा माय सेल्फीत आणता येते. वनश्रीची श्रीमंती वा वैभव असे ज्याला म्हणतात, ते खूप मोठ्या लांबीचे व तेवढेच रूंद सागवानाचे लाकूड येथील काष्ट भांडारात दर्शनार्थ ठेवले आहे. त्या लाकडावर त्या त्या वर्षाच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. या भव्य लाकडासोबत सेल्फी न काढले तर नवल. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसर तर सेल्फीप्रेमींचे अत्यंत आवडीचे ठिकाण झाले आहे. फलाटांवर विविध प्राण्यांचे जिवंत वाटावे असे पुतळे, भिंतीवर नानाप्रकारची वेधक चित्र मन आकर्षून घेतात आणि ते सारे सेल्फीकरिता खुणावतात. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कोणतीही गाडी दहा-पंधरा मिनिटे थांबतेच. येथील नव्याने बांधलेले बसस्थानक हे तर साऱ्यांचे आवडीचे सेल्फी स्थळ झाले आहे.
सेल्फी काढताना मात्र काळजी घेणे आवश्यक
श्री बालाजी मंदिर हे श्रद्धास्थानही त्यापुढे उभे राहून सेल्फी काढावे असे प्रेक्षणीय आहे. येथील बसस्थानकाच्या सडकेला लागून असलेल्या मोकळया उंच भागावर पेपरमिलच्या दिशेने उभे राहून सेल्फी काढली की पेपर मिलची अवाढव्यता आपल्या मागे फोटोत ठळकपणे दिसते. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील पावर हाऊस जवळील स्लज टेकडी व घाटरोड सदृश्य भाग सेल्फीचे उत्तम ठिकाण आहे. वर्धा नदीवरील सास्ती तसेच राजुरा पूल हीसुद्धा सेल्फी स्थळ आहेत. बल्लारपूर शहरात सेल्फी स्थळांची कमतरता नाही. सेल्फी काढताना आवश्यक ती काळजी घेणे, तेवढे गरजेचे आहे. अन्यथा एखादा अपघात घडण्याची दुर्दैवी वेळ येण्याची शक्यात असते.