बल्लारपूर न.प.चे १६७ कोटी ५२ लाखाचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:45+5:302021-02-16T04:29:45+5:30
फोटो बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेचे सन २०२१-२०२२ चे अंदाजपत्रक १६७ कोटी ५२ लाख ६९ हजार ३८० रुपयाचे आहे. ...
फोटो
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेचे सन २०२१-२०२२ चे अंदाजपत्रक १६७ कोटी ५२ लाख ६९ हजार ३८० रुपयाचे आहे. हे एकूण अंदाजित उत्पन्न असून खर्च १६७ कोटी ३० लाख ७५ हजार ७७८ रुपये धरण्यात येऊन शिल्लक २१ लाख ९३ हजार ६०२ रुपये दाखविण्यात आले आहे.
या अंदाजपत्रकात पहिल्या सहा महिन्यातील मालमत्ता कराच्या वाढीला सवलत देण्यात आली आहे. तसेच विशेष स्वच्छता कर रद्द करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या सुविधा व शहर विकासावर भर दिल्याचे दिसून येते. दिव्यांग व दुर्बल घटक तसेच बाल आणि महिला या घटकावर प्रत्येकी २७ लाख १६ हजार ९८ रुपये असे एकूण ८१ लाख ५० हजार ९४ रुपये खर्च धरण्यात आलेला आहे. शहरातील वाढीव पाणी योजना, सांडपाणी, रमाई योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दलित वस्ती सुधारणा यावर भर देण्यात आलेला असून, नगर परिषदेच्या कॉन्व्हेंट शाळेचा दर्जा उंचावण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, भूमिगत गटारे, चौकांचे सौंदर्यीकरण, घनकचरा व्यवस्थापन, सामान्य जनतेकरिता आरोग्य सेवा इत्यादींचा अंदाजपत्रकात समावेश आहे. नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या विशेष सभेत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अंदाजपत्रक मांडले. त्याचे वाचन लेखापाल राजेश बांगर यांनी केले. अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी दिली. उपाध्यक्ष मीना चौधरी, काँग्रेसचे गटनेते सचिन जाधव, शिवसेनेचे गटनेते विनोद यादव, सभापती, नगरसेवक यांची सभागृहात उपस्थिती होती.