बल्लारपूर पेपर मिलने लावली वैदर्भियांना फूटबॉलची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:52 AM2018-06-21T11:52:27+5:302018-06-21T11:52:37+5:30
फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी!
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फुटबॉल खेळाने एकेकाळी विदर्भातील नागरिकांना आपलेसे केले होते. त्याचे कारण बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाची फुटबॉलमध्ये असलेली गोडी! त्यांच्या या गोडीतूनच पेपरमिल कॉलनीतील फूटबॉल मैदानावर सातत्याने ३० वर्षे अखिल भारतीय स्तरीय फूटबॉल सामने होत राहिलेत. हे सामने बघण्याकरिता केवळ पेपरमिल कॉलनीच नव्हे तर बल्लारपूर परिसरातील बामणी, विसापूर व चंद्रपुरातील फुटबॉलप्रेमी यायचे. पेपर उद्योग सुरू झाल्याच्या काही वर्षांतच पेपर मिलने क्रीडा मैदान तयार करून त्याला ‘फूटबॉल ग्राऊंड’ असे नाव दिले होते. या मैदानावर कबड्डी, हॉकी इत्यादी खेळ खेळले जात. मात्र, व्यवस्थापनाचा भर फूटबॉल खेळाकडे अधिक होता. कर्मचारी व त्यांच्या मुलांची या खेळात रूची वाढावी, चांगले खेळाडू तयार व्हावेत हा व्यवस्थापनाचा हेतू होता. याकरिता खेळाडूंना विविध सोयी पुरविल्या जात असे. यातून पेपर मिलची फूटबॉल टीम तयार झाली. या टिमने अन्य राज्यांत खेळून काही बक्षिसेही पटकाविली होती. या मैदानावर वार्षिक विशाल मेळावा आणि रावणदहन कार्यक्रम व्हायचा. मात्र या मैदानाची फूटबॉल मैदान हीच अखेरपर्यंत राहिली. नंतर व्यवस्थापनाने थापर उद्योग समूहाचे संस्थापक स्व. लाला करमचंद थापर यांच्या स्मृतीत अखिल भारतीयस्तरीय फूटबॉल सामने भरविणे सुरू केले.
या सामन्यात पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र, आसाम तसेच अन्य राज्यांतील नामवंत टीम खेळायला येऊ लागल्या. सुमारे १२-१५ दिवस चालत राहणाऱ्या सामन्यातील चमूच्या खेळांची चर्चा व्हायची. अंतिम महत्त्वाचे काही सामने कर्मचाºयांना बघता यावे याकरिता व्यवस्थापन पाळीच्या वेळामध्ये बदल करीत होती. यामुळे हे सामने बघण्याला कर्मचाऱ्यांना संधी मिळून त्यांची सामन्यात रूची वाढायची आणि अंतिम सामना कोण जिंकणार याची त्यांच्यात पैज लागायची. अंतिम दोन तीन सामने बघण्याकरिता फूटबॉल प्रेमींची या मैदानाकडे रिघ लागायची. अशी प्रचंड लोकप्रियता येथे या खेळाला मिळाली होती.
फूटबॉल सामने हे एखाद्या मोठ्या पर्वासारखे क्रीडाप्रेमींना वाटायचे. काही वर्षांनी मात्र यात व्यवस्थापनाची रूची कमी होत गेली. उद्योगाच्या विस्ताराची इमारत याच फूटबॉल मैदानावर उभी करण्यात आली. ३० वर्षे सुरू असलेल्या सामन्यांची परंपरा कायमची बंद झाली. सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रम ठप्प झाले ते कायमस्वरूपातच! आता केवळ आठवणी स्मरणात राहिल्या आहेत.
कलामंदिराला आली अवकळा
बल्लारपूर पेपर मिलने कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याकरिता बीपीएम कलामंदिर संस्थेची स्थापना केली. भव्य मंच उभारून ‘कलामंदिर’ असे मोहक नाव त्या परिसराला देण्यात आले होते. कलामंदिराच्या मंचावरुन आठवड्यातून एकदा चित्रपट दाखविला जात होता. या मंचावर हिंदी-मराठी नाट्य तसेच एकांकिका स्पर्धा, कवी संमेलन, आर्केस्ट्रा, रामलिला हे कार्यक्रम व्हायचे. आता ते सारे कार्यक्रम बंद होऊन कलामंदिराला अवकळा आली आहे.