बल्लारपूर टपाल खात्याचा भोंगळ कारभार
By admin | Published: May 28, 2016 01:12 AM2016-05-28T01:12:09+5:302016-05-28T01:12:09+5:30
पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते.
आरडीचे एजंट त्रस्त : आठ दिवसांपासून आॅनलाईन सेवा बंद
बल्लारपूर : पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते. ग्रामीण टपाल जीवन विमा व अल्प बचत योजना राबविली जाते. देशाच्या आर्थिक व्यवहारात हातभार लावण्याचे काम अल्प बचत योजनेचे एजंट करीत आहेत. मात्र येथील टपाल खात्याचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. टपाल खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आरडीचे एजंट त्रस्त झाले असून येथील आॅनलाईन सेवा मागील आठ दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे.
बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही अल्प बचतीचे काम करणारे शेकडोंवर एजंट कार्यरत आहेत. खातेदारांकडून मासिक बचत गोळा करून पोस्टाच्या कार्यालयात जमा करावे लागते. यात महिला एजंटाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. सदर एजंटाच्या माध्यमातून पोस्टाच्या कार्यालयात दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत खातेदारांची रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. मात्र येथील टपाल खात्याची आॅनलाईन सेवा १२ मेपासून बंद असल्याने आरडीच्या एजंटाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ वाजतापर्यंत आरडीचे खाते स्वीकारण्याची वेळ आहे.
मात्र येथील टपाल विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे आरडीच्या एजंटाना कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच टपाल विभागात तांत्रिक सुविधाचा अभाव निर्माण झाला आहे. काही अडचणी असल्या तरी येथील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची वागणूक ग्राहकांसाठी अपमानास्पद असल्याची आपबीती येथील एका महिला बचत एजंटानी ‘लोकमत’ला सांगितली. (शहर प्रतिनिधी)