बल्लारपूरला हागणदारीमुक्तीचा द्वितीय पुरस्कार
By Admin | Published: May 6, 2017 12:36 AM2017-05-06T00:36:58+5:302017-05-06T00:36:58+5:30
राज्यात आतापर्यंत २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहे.
दोन कोटींचे बक्षीस : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राज्यात आतापर्यंत २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिका द्वितीय क्रमांकावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बल्लारपूर नगरपरिषदेला दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदा, सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसेच महापालिकांच्या विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आले होते.
याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांनी नागपूर विभागातून मिळालेला द्वितीय पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमात उत्कृष्ट ‘अ’ वर्ग नगरपरिषदांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्कृष्ट ‘ब’ वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तीन कोटी रुपयांचा तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि उत्कृष्ट ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.