बल्लारपूर तालुक्यात ९९ टक्के पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:54+5:302021-07-09T04:18:54+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा ...
मंगल जीवने
बल्लारपूर : तालुक्यात खरीप हंगामाच्या ९९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत व अजूनही काही पेरण्या सुरू आहेत. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा १७० टक्क्याने वाढला आहे. पीक आता वर आले आहे. दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु पुनर्वसू नक्षत्राची रिमझिम सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
तालुक्यात यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लवकर सुरू झाल्या. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र संपेपर्यंत ९९ टक्के पेरण्या आटोपल्या. परंतु आर्द्रा नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले व पावसाच्या सरी बरसू लागल्याने शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागलेले डोळे सुखावले आहे. बल्लारपूर तालुक्यातील ३५ गावांमध्ये सात हजार नऊपेक्षा जास्त शेतकरी बांधव असून, तालुक्यामध्ये सात हजार ७८१ हेक्टर एवढे खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. आतापर्यंत चार हजार ५४९.९० हेक्टरवर बळीराजाने सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांची लागवड केली आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मागच्या वर्षी ३५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. यंदा यात ५९७ हेक्टरने वाढ झाली आहे. सोयाबीनचा पेरा १७० टक्क्यांनी वाढला आहे.
भात पिकाचे सरासरी क्षेत्र दोन हजार ८७७ हेक्टर आहे. यापैकी आवत्या २.५०, तर रोहिणी ५.४० हेक्टरवर झाली आहे. भातपिकाला मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागच्या वर्षी कापसाचा पेरा तीन हजार ७९१ हेक्टर होता. यावर्षी मात्र तीन हजार ५३८ हेक्टरवर थांबला आहे. कडधान्य पेरणी ५१३ हेक्टर पैकी ३६०.४० हेक्टरवर झाली आहे. हळद, मिरची, भाजीपाल्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे तर खरीप ज्वारी, मका, तीळ, फुलशेती व इतर कडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
कोट
तालुक्यात मागील आठवड्यात ८० टक्के पेरणी झाली होती व आता ती ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. यावर्षी शेतकरी बांधवांचा ओढा सोयाबीन पेरणीकडे वळल्याने सोयाबीनची पेरणी जास्त झाली आहे.
- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर
बॉक्स
एकूण पेरणी क्षेत्र - ७७८१ हे.
झालेली पेरणी - ४५४९ हे.
सोयाबीन- ५९७ हे.
कापूस- ३५३८ हे.
तूर- ३५८ हे.
080721\20210708_102127.jpg
सोयाबीन चे वर आलेले पीक.