बल्लारपूर तालुक्यात विधानमंडळ समितीने घेतला रोहयो कामाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:02+5:302021-09-04T04:33:02+5:30
विसापूर : राज्य विधानमंडळ रोहयो समितीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी योजनेच्या कामाच्या ...
विसापूर : राज्य विधानमंडळ रोहयो समितीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी योजनेच्या कामाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी व उणिवा दूर करण्यासाठी गुरुवारी (दि. २) बल्लारपूर तालुक्यात आढावा घेतला.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विसापूर, बामणी, कळमना व इटोली येथील रोहयो कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामावरील मजुराशी संवाद साधून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय रोहयो समितीत रावेर, जि. जळगाव मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, हिंगणघाट, जि. वर्धा येथील आमदार समीर कुणावार, बागलाण, जि. नाशिक येथील आमदार दिलीप बोरसे, उमरखेडा, जि. जालना येथील आमदार राजेश राठोड यांचा बल्लारपूर तालुका पाहणी दौऱ्यात समावेश होता. विधानमंडळ रोहयो समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत विसापूर येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार संजय राईंचवार, नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी विलास ताजने, ग्रामविकास अधिकारी राकेश मांढरे उपस्थित होते. बामणी येथील रोहयोमधून बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्याची पडताळणी समितीने केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी योजनेमधून पूर्ण झालेले व अपूर्ण कामाचा आढावा घेतला. बल्लारपूर तालुक्यातील कळमना व इटोली येथील जलसंधारण, सिंचन व जवाहर विहीर, फलोत्पादन कामासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहितीदेखील समितीने घेतली.
बाॅक्स
विसापुरात समितीकडून मजुरांच्या सह्यांची पळताळणी
महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती सदस्यांनी विसापूर ग्रामपंचायतीला भेट दिली. या भेटीत त्यांनी बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वनविभागाच्या रोपवाटिकेतील काम केलेल्या मजुरांचे हजेरी पट तपासले. तीन ते चार मजुरांना बोलावून हजेरी पटावरील सही व प्रत्यक्ष सहीची पडताळणी केली. मात्र काहीच संशयस्पद आढळून आले नाही.