बल्लारपुरातून १० लाखांचा कागद घेऊन दिल्लीला गेलेला ट्रक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 09:33 AM2017-11-23T09:33:12+5:302017-11-23T09:36:09+5:30
बल्लारपूर पेपर मिलमधून आठ दिवसांपूर्वी ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन दिल्लीकडे निघालेला ट्रक गंतव्यस्थळी पोहचलाच नाही.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलमधून आठ दिवसांपूर्वी ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन दिल्लीकडे निघालेला ट्रक गंतव्यस्थळी पोहचलाच नाही. ट्रकमालकही उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अशी तक्रार कार्तिक ट्रान्सपोर्ट संचालक सुनील तुकाराम टेकाम (३९) रा. बालाजी वॉर्ड, बल्लारपूर यांनी पोलिसात केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबरला सकाळी ट्रान्सपोर्ट संचालक सुनील टेकाम यांच्याकडे एक अनोळखी इसम ट्रक घेऊन आला. त्याने आपण आपण या ट्रकचा चालक असून राजस्थानला काही माल पाठवायचा असेल तर सांगा, असे तो म्हणाला. टेकाम यांनी आपल्याशी संबंधित व्यवसायिकाशी संपर्क केला असता राजस्थान नाही पण, दिल्लीला पेपर मिलमधून पेपर न्यायचे आहे, असे कळले. टेकाम यांनी सदर ट्रक चालकाला त्यांच्याकडे पाठविले. सोबत डिझेलकरिता १४ हजार ४०० व कामाची अग्रीम रक्कम म्हणून १० हजार रुपये सोबत दिले. पेपर मिलमधून ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन ट्रक येथून रवाना झाला. हे कागद माणिसार (दिल्ली) येथील शैलेजा पेपर मार्टला द्यायचे होते. परंतु कागद तेथपर्यंत पोहचलेच नाही. त्या ट्रक चालकाने आपल्या ट्रकचा मालक म्हणून ज्याचे नाव सांगितले त्याच्याशी टेकाम यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला पण, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. टेकाम यांनी दिल्ली मार्गावरील टोलनाक्यांवर ट्रकचा क्रमांक सांगून विचारपूस केली. मात्र काहीही हाती लागले नाही. अखेर हताश होऊन टेकाम यांनी बल्लारपूर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींवरुद्ध कलम ४०६ (३४) व ४२० (३४) या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गोखरे व संजय गंधेवार हे तपास करीत आहेत.