कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बल्लारपूरचे पाणी बंद
By Admin | Published: December 8, 2015 12:50 AM2015-12-08T00:50:09+5:302015-12-08T00:50:09+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी तथा अधिकारी यांनी सात डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.
वरिष्ठांनी लक्ष द्यावे : संप सुरूच राहिला तर नागरिकांसमोर मोठे संकट उद्भवणार
बल्लारपूर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी तथा अधिकारी यांनी सात डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे येथील पेयजल वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बंद पडल्याने बल्लारपूर शहरात नळाद्वारे होणारा पाणी पुरवाठ आज सोमवारपासून बंद पडला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संपत सुरुच राहणार, असे संपकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे संपकाळात पाण्याबाबत मोठी समस्या उभी राहणार आहे.
सोमवारी संपाचा पहिला दिवस असल्यामुळे याची तिव्र झळ नळधारकांना बसली नाही. (तांत्रिक अडचणीपायी ही समस्या उदभवली असावी असा समज पहिल्या दिवशी झाला आहे.) परंतु, हा संप सुरूच राहिला तर मात्र गंभीर समस्या उद्भवणार आहे. येथील पेयजल शुद्धीकरण व पाणी पुरवठा संयत्राची सेवा पूर्णत: ठप्प असून त्या विभागाच्या प्रमुख दाराला कुलूप लावले आहे. द्वाराजवळ संपकरी ठाण मांडून बसले आहेत. या संपाची पूर्वसूचना शासन तसेच नगर परिषद, तहसीलदार व पोलीस स्टेशनला या संपाचे नेतृत्व करीत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची संघटना संघर्ष समितीने दिली आहे. महाराष्ट्र जीव प्राधिकरण ही योजना शासनाने घ्यावी आणि तेथील कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पूर्वी राज्यातील पाणी पुरवठा योजना शासनाच्या अधीन होत्या. नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या मंडळाकडे त्या सोपविण्यात आल्या. मजीप्राकडून त्या स्थानिक स्वराज्य संस्थाकडे गेल्यात. यामुळे राज्यात आता केवळ ५७ ठिकाणीच मजीप्रा त्या चालवीत असून उत्पन्न कमी खर्च अधिक यामुळे ही योजना तोट्यात चालली आहे. भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न या संकटापायी उभा झाला आहे. यामुळे, शासनाने ही योजना आपल्याकडे घ्यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मजिप्रा फक्त बल्लरपूर येथेच कार्यरत असून त्यात ५० कर्मचारी आहेत. ते सर्वच या संपात उतरले आहेत. (तालुका प्रतिनिधी)