बांबू कलेतून जिल्हा रोजगाराभिमुख होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:52 PM2018-09-14T22:52:35+5:302018-09-14T22:53:17+5:30
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला शक्तीच्या पाठीमागे खंबीर उभा असून बांबू कला प्रशिक्षणातून जिल्हा रोजगाराभिमुख करण्याचा संकल्प राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बीपीएड कॉलेज मार्गावर बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट अर्थात भाऊ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी नामदार मुनगंटीवार बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळ, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.
चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची प्रसार माध्यमाने सिंगापूरपर्यंत पोहचविली. बांबू कला जगात प्रसिद्धीला येत आहे. बांबू कलेतून तयार साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. आकर्षक वस्तूंनी अनेकांना भुरळ पाडली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सामान्याचे जीवनमान उंचावणाऱ्या असून लाभान्वितांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील लाखांवर कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य देण्याचा प्रयत्न असून कोणीही उपासी राहणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
विजय टोंगे व किशोर पंदीलवार यांना बांबू रोपटे प्रदान करून शेती उन्नत करण्याचा मार्ग दाखविला. महिला बचत गटांना टूल किटचे वाटप देखील करण्यात आले.