चंद्रपूरसह मुंबई, पुणे व नागपुरात यंदा बांबूच्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:10 PM2018-08-13T15:10:13+5:302018-08-13T15:12:49+5:30
बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बहिण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहिण आधीच राखीचा बेत ठरवून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू उत्पादन होते. बांबूवर आधारित उद्योग असावा. त्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध भागात नव्या रोजगाराची निर्मिती व्हावी, या उद्दात्त हेतूने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. हे केंद्र सुरू झाल्यापासून हजारो हातांना काम मिळाले. बांबूपासून घराच्या दिवाणखाण्यापासून तर कार्यालयात शोभून दिसेल अशा वस्तूंची निर्मिती सुरू झाली. आता या केंद्राने एक पाऊल पुढे टाकत यावर्षीपासून बांबूपासून चक्क राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कामही सुरू आहे. या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार प्रशिक्षण केंद्रात १३० महिला मागील १५ दिवसांपासून या राख्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. आतापर्यंत २० हजार राख्या तयार झाल्याअसून मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने २० आॅगस्टपर्यंत ५० हजार राख्यांचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यवेक्षिका योगिता साठवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मुंबई, पुणे व नागपुरातून मागणी
बांबूपासून राखी निर्मितीची कल्पनाच नाविन्यपूर्ण होती. ही कल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आवडली. या राख्यांना राज्यात मोठी मागणी आहे. पहिले वर्ष असल्यामुळे चंद्रपूर, मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात या राख्या पाठविण्यात येणार असल्याचे बांबू रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग सेंटरचे संचालक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वनमंत्र्यांना आज राखी बांधून होणार भुभारंभ
बांबूपासून बनविलेल्या राख्यांबाबत सर्वत्र कुतुहल निर्माण झाले आहे. ही राखी सर्वप्रथम मंगळवार दि. १४ आॅगस्टला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बांधून या नवोपक्रमाचा शुभारंभ बल्लारपूर येथून करण्यात येणार आहे. यानंतर या राख्या मागणी असलेल्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे.