वनाधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे बांबू व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:48+5:302021-07-13T04:06:48+5:30
फोटो चिमूर : चिमूर तालुक्यातील पिपर्डा, पळसगाव, विहीरगाव, मासळ, गोंड मोहाडी, मदनापूर, आडेगाव या परिसरात बांबू कामगार (बुरड) ...
फोटो
चिमूर : चिमूर तालुक्यातील पिपर्डा, पळसगाव, विहीरगाव, मासळ, गोंड मोहाडी, मदनापूर, आडेगाव या परिसरात बांबू कामगार (बुरड) मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सूप, टोपली, ताटवे बनविण्याचा असून, याच व्यवसायातून त्यांची उपजीविका चालते. मात्र, पळसगाव (बफर झोन) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ठेमस्कर यांच्या एकाधिकारशाही धोरणामुळे व अफलातून नियमामुळे या परिसरातील बांबू (बुरड) कामगार अडचणीत आले असून, त्यामुळे या बुरड कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे, असा आरोप बुरड व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पनिर्मितीच्या पूर्वीपासून चिमूर तालुक्यातील पळसगाव, पिपर्डा, आडेगाव, विहीरगाव, मदनापूर गावातील नागरिकांचा अनेक पिढ्यांपासून मुख्य व्यवसाय हा बांबूपासून सूप, टोपल्या, ताटवे, डाले यासह पारंपरिक कौशल्यातून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून विक्री करणे हा आहे. या व्यवसायातूनच ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बांबू हा वनौपज नसल्याचा निर्णय दिल्याने याचा उपयोग करून या परिसरातील ७५० बांबू कारागीरांना (कार्डधारक) वन विभागाने बांबू निस्तार हक्काने खरेदी करण्याचा परवाना दिला आहे. त्यामुळे हे बांबू कारागीर (बुरड) पळसगाव येथील बांबू डेपोमधून बांबू खरेदी करून ताटवे, टोपली इत्यादी वस्तू बनवून विक्री करतात व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.
मात्र, पळसगाव बफर झोन येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तिलांजली देत बांबूपासून ताटवे बनवीत असाल तर डेपोतून निस्तार दराने बांबू मिळणार नाही व बनविताना दिसले तर जप्त करण्यात येतील, असा नवीन नियम लावून या विभागातील बुरड व्यावसायिकांना दम दिला आहे. त्यामुळे या गावातील बांबू व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे या गावातील बुरड बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा निर्णय रद्द न केल्यास वनक्षेत्र कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा बांबू मार्टस् युनियनचे अध्यक्ष रूपचंद बारसागडे, सचिव ज्ञानेश्वर ढोक, अतुल रमेश मेश्राम, महेश घोडमारे, रमेश पिसे व उत्तम ढोक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.