बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र विकासाला चालना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:15 AM2017-09-30T00:15:14+5:302017-09-30T00:15:27+5:30
चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणाºया वस्तू देश-विदेशातील बाजारात चंद्रपूरचे नाव उज्वल करतील. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणाºया वस्तू देश-विदेशातील बाजारात चंद्रपूरचे नाव उज्वल करतील. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. चंद्रपूर व परिसरातील आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून ‘बीआरटीसी’ची ओळख होईल. हे केंद्र स्वप्नपूर्तीचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ सोहळा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.एस.यादव, वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.गुप्ता, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे पाटील, आयआयटी मुंबईचे सहप्राध्यापक संदेश आर.एम., बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.
२०१४ मध्ये जेव्हा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा दुसºयाच बैठकीत बांबू प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लगेच बांबूवरील वाहतूक कर रद्द केला. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला देशातील जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्राचारण करण्यात आले. महाराष्ट्राच्या पुर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू कारागिराच्या कौशल्याला बघून रतन टाटा देखील भारावून गेले होते. चिचपल्ली येथे १ लाख फुटामध्ये जी इमारत बनणार आहे, तशी इमारत भारतात कुठेही नसून या ठिकाणच्या वास्तूसाठी रतन टाटांनी वास्तूविशारदांचे शुल्क ट्रस्टतर्फे दिले आहे.
भारतातील सर्वांत सुंदर आणि संपूर्ण बांबूपासून तयार झालेली वास्तू चिचपल्ली येथे उभी राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक मुख्य संरक्षक विजय शेळके यांनी केले. संचालन हेमंत शेंडे यांनी तर आभार बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी मानले.