'त्या' विजेच्या खांबाची मलमपट्टी !
By admin | Published: January 10, 2015 01:04 AM2015-01-10T01:04:48+5:302015-01-10T01:04:48+5:30
येथील धोकादायक विजेच्या खांबाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज मंडळाला जाग आली आणि बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या खांबाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले.
घोडपेठ : येथील धोकादायक विजेच्या खांबाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज मंडळाला जाग आली आणि बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या खांबाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले. या खांबाची आता थातूरमातूर डागडूजी करण्यात आली आहे.
३० डिसेंबरच्या अंकात ‘घोडपेठ येथील विजेचा खांब धोकादायक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. घोडपेठ येथील ४० वर्षे जुना विजेचा खांब बुडातून पुर्णपणे सडला असुन तो केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आजुबाजुला घरे असल्यामुळे तसेच लहान मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीतीला अधिकाऱ्यांच्या निदर्शनास अनेकदा ही बाब आणून दिली. मात्र अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले होते.
‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सडलेल्या खांबाला नट, बोल्ट व लोखंडी पट्टीच्या सहाय्याने तात्पुरती मलमपट्टी केली आहे.
हा खांब वाकलेला असुन एखाद्यावेळी जवळच्याच घरावर पडुन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज मंडळाकडून सध्या करण्यात आलेली खांबाची डागडुजी ही तात्पुरत्या स्वरूपात असुन फार काळ टिकणारी नसल्यामुळे हा खांब पुर्णपणे बदलविण्यात यावा, अशी मागणी घोडपेठ येथील नागरिकांकडुन केली जात आहे. (वार्ताहर)