प्लास्टिक बंदीचा जिल्ह्यात बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:15 AM2019-06-24T00:15:47+5:302019-06-24T00:16:14+5:30
काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे.
बंदीनंतर सामान्य नागरिक प्लास्टिक पिशव्याचे दुष्पपरिणाम लक्षात घेता गाडीच्या डिक्कीत एखादी कापडी पिशवी घालून भाजीपाला आणत होता. अलीकडे कुठल्याही दुकानात कॅरीबॅग सहज मिळत आहे.
प्लास्टिकमुळे विविध आजार पसरत असून त्याचे विघटन देखील होत नसल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्टÑ शासनाकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत नाही. पानठेला, आठवडी बाजार, किरणा दुकान, हॉटेल, व्यावसायिक व रस्त्यावरील दुकान, छोटेमोठे व्यापारी यांच्याकडून प्लास्टिक पिशव्यांचे सर्रास वापर होत आहे. मात्र प्रशासन या बाबींकडे कानाडोळा करीत असून शासनाच्या या चांगल्या निर्णयाला हरताळ फासल्या जात आहे. प्लास्टिक पिशव्या मिळत असल्यामुळे ग्राहकही बिनधास्तपणे या पिशव्यांचा वापर करीत आहेत. शासनानी बंदी आणलेली प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येऊ नयेत यासाठी नागरिकांमध्ये व शाळा, विद्यालयामध्ये जनजागृती करून प्रशासनाने दुकानदारांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
बंदीच्या वेळी दुकानदारांनीही प्लास्टिक बंदीचे स्वागतच केले होते. मात्र सरकार जाणीवपूर्वक बंदीचा ढोंग करते असे व्यावसायिकांचे मत आहे. दुकानातून कॅरीबॅग बंद करण्यापेक्षा कॅरीबॅगची कंपनीच बंद केली तर या अडचणी येणार नाहीच असेही व्यावसायिकांचे मत आहे.