आगीत घर जळालेल्या कुटुंबीयांना बँकेची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:08+5:302021-06-04T04:22:08+5:30
मूल : वातावरणातील बदलानुसार वादळी वारा सुरू असताना अचानक राजोली येथील लेनगुरे कुटुंबीयांच्या घरावर आगेची ठिणगी पडून घरातील साहित्य ...
मूल : वातावरणातील बदलानुसार वादळी वारा सुरू असताना अचानक राजोली येथील लेनगुरे कुटुंबीयांच्या घरावर आगेची ठिणगी पडून घरातील साहित्य जळून खाक झाले. सदर माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना होताच त्यांनी शेतकरी कल्याण निधी अंतर्गत प्रत्येकी १० हजार रूपयाचे धनादेश आपदगस्त कुटुंबीयांच्या घरी जाऊन दिले.
मूल तालुक्यातील मौजा राजोली येथील लतेश्वर पैकू लेनगुरे, ईश्वर पैकू लेनगुरे आणि बालाजी पैकू लेनगुरे हे सख्खे भाऊ मजुरी करून एकाच सामूहिक कौलारू घरात आपल्या कुटुंबासह राहत होते. नुकत्याच आकस्मिक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावर आगीची ठिणगी पडली. काही क्षणातच त्यांचे संपूर्ण घर व दैनंदिन साहित्यासह बेचिराख झाले. या तिन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रूपयाचे धनादेश त्यांच्या घरी जाऊन दिले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, राजोलीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील गुज्जनवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पा. ठिकरे, राजोली सरपंच जितेंद्र लोणारे, उपसरपंच गजानन ठिकरे, सदस्य निकिता खोब्रागडे, पल्लवी निकरे, शाम पुटावार, बँकेचे वरिष्ठ अधिकारी नंदू मडावी, बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश रेड्डीवार उपस्थित होते.