बँक अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:34 AM2018-05-04T00:34:07+5:302018-05-04T00:34:07+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेअंतर्गत पे-आॅफिस बाळापूर येथील शाखा व्यवस्थापकाने खातेदारांच्या रक्कमेतून ६० ते ६५ लाख रूपयांची उचल केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा.) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेअंतर्गत पे-आॅफिस बाळापूर येथील शाखा व्यवस्थापकाने खातेदारांच्या रक्कमेतून ६० ते ६५ लाख रूपयांची उचल केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. त्यामुळे अनेक खातेदारांनी रक्कम परत मिळविण्यासाठी अनेकदा निवेदने दिली, आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातेदारांचे पैसे २ मे पर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेली डेडलाईन जाऊनही रकम जमा न झाल्याने खातेदारांनी गुरूवारी बँक अधिकाºयांना घेराव घालून कोंबून ठेवले.
बाळापूर पे-आॅफिसचे व्यवस्थापक मोरेश्वर गरफडे यांनी चारशे ते पाचशे खातेधारकांच्या व्यवहारातून परस्पर ६० ते ६५ लाख रूपयांची उचल केली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी पे-आॅफिसच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली. त्यानंतर अनेक खातेदारांच्या रक्कमेतून पैशांची उचल केल्याचे निदर्शनास आले होते. या परिसरातील बाळापूर देवपायली, राजोली बोंड, सोनुर्ली, पारडी, नवानगर, येथील अनेक शेतकरी, शेतमजुरांनी आपले पैसे सुरक्षित राहावे, याकरिता रोख स्वरूपात पैसे भरलेले होते. मात्र शाखा व्यवस्थापकांने खातेधारकांना अंधारात ठेवून पैशाची परस्पर रक्कम उचल केली.
बाळापूर येथील खातेदार सचिन भोपचे यांनी खातेदारांची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर २ मे ला पैसे जमा करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे बुधवारी अनेक खातेदारांनी सीडीसीसी पे-आॅफिसकडे धाव घेतली. परंतु, खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा न केल्याने अनेक खातेदारांमध्ये रोष निर्माण झाला. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने पैशाची परस्पर उचल करून गैरव्यवहार केलेले असताना ग्राहकांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त खातेदारकांनी पे-आॅफीसचे विद्यमान प्रभारी व्यवस्थापक अनिल डोंगे व विभागीय अधिकारी एन. टी. शेंडे यांना बँकेतच घेराव घातला व कोंबून ठेवले.
त्यामुळे सीडीडीसी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशन गाठले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर हे आपल्या ताफ्यास बँकेत दाखल झाले. त्यांनी बँक अधिकारी व खातेदारांशी चर्चा करून खातेधारकांचे पैसे शनिवारपर्यंत खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली. या बँकेत शेकडो ग्राहक असून अनेकांच्या खात्यावरून रकम उचल करण्यात आल्याने चिंता पसरली आहे.