बँका उघडल्या, ग्राहकांची झुंबड
By admin | Published: November 16, 2016 12:54 AM2016-11-16T00:54:04+5:302016-11-16T00:54:04+5:30
गुरूनानक जयंतीनिमीत्त सोमवारी बँकांना सुट्टी होती. या दिवशी एटीएमही बंद होते.
एटीएमसमोर लांबच लांब रांगा : बँकांमध्येही तोबा गर्दी
चंद्रपूर : गुरूनानक जयंतीनिमीत्त सोमवारी बँकांना सुट्टी होती. या दिवशी एटीएमही बंद होते. मंगळवारी बँका व एटीएम पुर्ववत सुरू झाले आणि नोटा बदलीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली. एटीएमसमोर लांबच लांब रांगा तर बँकांमध्येही तोबा गर्दी दिसून आली.
५०० व १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेला आठ दिवस लोटले आहेत. गेल्या मंगळवारच्या रात्रीपासून नोटा बदलीसाठी ग्राहकांची भागम्भाग सुरू आहे. ग्राहकांना नोटा बदलता यावे, यासाठी शनिवार व रविवारीही बँका सुरू होत्या. मात्र सोमवारी गुरूनानक जयंतीनिमीत्त बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळाली.
मंगळवारी सकाळी बँका जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा गेल्या चार दिवसांसारखीच परिस्थीती बघायला मिळाली. बँकेत आणि एटीएमसमोरही लांबच लांब रांगा लागल्याने अनेक ग्राहक त्रस्त दिसून आले. मात्र ५०० व १००० च्या नोटा व्यवहारात स्वीकारले जात नसल्याने नाईलाजास्तव अनेकांना नोटा बदली व एटीएममधून पैसे काढावे लागल्याचे दिसून आले. रेल्वे, रूग्णालये, पेट्रोल पंपावर २४ नोव्हेंबर पर्यंत ५०० व १००० च्या नोटा स्वीकारले जाणार असून मनपा, वीज वितरण आदी ठिकाणीही शासकीय कराची देयके ५०० व १००० च्या नोटांद्वारे स्वीकारले जात आहे. त्यामुळे कर भरणाऱ्यांची गर्दी वाढतच असून आतापर्यंत कोटींच्या घरात करवसुली झाली आहे. सध्या परिस्थीती सुधारण्याला आणखी काही दिवस लागणार असून गर्दी कायम राहण्याचे चिन्ह आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
सध्या उधारीवर सुरू आहेत व्यवहार
४००० हजार रूपये पर्यंत नोटा बदली करून दिले जात असून एटीएममधून २४०० रूपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ज्यांना बँकेद्वारे दोन हजार रूपयाची नवी नोट मिळाली त्यांना त्या नोटचे सुट्टे पैसे मिळवण्यासाठी मोठी कसरतच करावी लागत आहे. पाचशे रूपयाची नवी नोट चलनात यायची असल्याने दोन हजार रूपयाच्या नव्या नोटेच्या बदल्यात सुटे पैसे १०० रूपयाच्या नोटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवहार उधारीवर सुरू आहेत.
शेतकऱ्यांसमोर बियाणे खरेदीचा पेच
सध्या रबी हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी या कामात व्यस्त आहेत. मात्र ५०० व १००० च्या नोटा बाद झाल्याने बियाणे खरेदीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकरीही उधारीवरच बियाणांची खरेदी करताना दिसत असून काही जण उधारी देण्यास नकार देत असल्याने रबी पीक पेरणीची अडचण अनेकांना निमारण झाली आहे.