सावली तालुक्यात डेंग्यू आजाराने बापलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:10+5:302021-08-15T04:29:10+5:30
सावली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या चिकमारा गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. दोन दिवसांच्या अंतराने ...
सावली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या चिकमारा गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. दोन दिवसांच्या अंतराने बापलेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सावली - सिंदेवाही मार्गावर असलेल्या चिकमारा गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. संपूर्ण गाव तापाने फणफणत आहे. जीवनदास ऋषी खोब्रागडे (४५) यांचा ११ ऑगस्टला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर दोनच दिवसांच्या अंतराने १३ ऑगस्टला त्याचा १३ वर्षीय मुलगा कुणाल याचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच गावात घरालगतच असलेल्या अशोक मुखरू मेश्राम (४०) याचाही ११ ऑगस्टला डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे गावात या आजाराची दहशत पसरली आहे. नागरिक भीतिदायक वातावरणात जीवन जगत आहेत. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घरातील कमावता एकुलता एक मुलगा व नातवाचे दोन दिवसाच्या अंतराने निधन झाल्याने वृद्ध आई-वडील व पत्नीवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. मृताच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी उपचाराचा खर्च केला. मात्र उपचाराला साथ न दिल्याने बापलेकांची प्राणज्योत मालवली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
140821\img-20210814-wa0116.jpg
मृतक बाप लेक