कोरानाच्या सावटात ढोल-ताशांच्या गजराविनाही बाप्पाचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:00 AM2021-09-11T05:00:00+5:302021-09-11T05:00:49+5:30

चंद्रपूरचा गणेशोत्सव विदर्भात प्रसिद्धच आहे. कोरोना महामारीने या उत्सवावर मर्यादा आल्या. ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात लावल्या जाणाऱ्या मूर्तीविक्री दुकानातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.  यंदा मूर्ती खरेदीसाठी फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेने सार्वजनिक मंडळांना ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा दिली.

Bappa's arrival in excitement without the sound of drums and trumpets | कोरानाच्या सावटात ढोल-ताशांच्या गजराविनाही बाप्पाचे उत्साहात आगमन

कोरानाच्या सावटात ढोल-ताशांच्या गजराविनाही बाप्पाचे उत्साहात आगमन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सरकारने यंदा तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले. या संकटाच्या सावटातच आज घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. मात्र, कुठेही ढोल-ताशांचा गजर नव्हता. मूर्ती घरी नेताना भाविकांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद ‘आले गणराया विघ्न हराया’ हीच मनोकामना व्यक्त करणारा होता. निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये काहीसा निरुत्साह आहे. संख्याही घटली.
चंद्रपूरचा गणेशोत्सव विदर्भात प्रसिद्धच आहे. कोरोना महामारीने या उत्सवावर मर्यादा आल्या. ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात लावल्या जाणाऱ्या मूर्तीविक्री दुकानातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.  यंदा मूर्ती खरेदीसाठी फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेने सार्वजनिक मंडळांना ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा दिली. त्याचा परिणाम मूर्ती विक्रीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणपूरक उत्सवासाठी निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज आहेत. पीओपी मूर्ती निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी मनपा पथकाची करडी नजर होती.

दोन हजार पोलीस तैनात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात दोन हजार पोलीस तैनात केले. गृहरक्षक दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात आली. तालुकानिहाय जबाबदारी सोपवून कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या.

साध्या पद्धतीचा स्वीकार
वाजत-गाजत बाप्पाला घरी नेण्याऐवजी अगदी साध्या पद्धतीचा भाविकांनी स्वीकार केला. अनेक व्यावसायिकांनी  अगदी वेळेवर मागणी नोंदवली. परिणामी, चौरंग किंवा पाट, मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ, तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थांचे दर वाढले. भाविकांना चढ्या दराने विकत घ्यावे लागले.

इको फ्रेंडली स्पर्धेला सुरुवात 
श्री गणरायाचा उत्सव हा गर्दी टाळून करावा. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेची सुरुवात आजपासूनच झाली. अंतिम तारीख १६ सप्टेंबर असून, मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

गणेशोत्सव पूजनाची प्राचीन परंपरा आहे. या उत्सवातून सुखाची व मांगल्याची अपेक्षा करतो. हा उत्सव साजरा करताना नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे कुठेही उल्लंघन होऊ नये, याची दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य जपावे.
- अजय गुल्हाने, 
जिल्हाधिकारी, चंद्रपूर

यंदाही कोरोना सावटातच गणेशोत्सव साजरा होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण गर्दी करू नये. कायदा व सुव्यवस्थेला कुठेही धक्का लावू नये. कोविड प्रतिबंधासाठी लागू केलेल्या सर्व नियमांची खबरदारी घ्यावी.
- अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, 
चंद्रपूर

 

Web Title: Bappa's arrival in excitement without the sound of drums and trumpets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.