बापरे..! चंद्रपुरात आढळले विदेशी बनावटीचे ई-सिगारेट, वेब फ्लेव्हर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:46 PM2022-10-11T22:46:24+5:302022-10-11T22:46:59+5:30
ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते. ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील रामनगर परिसरातील दुर्गा मंदिराजवळील निशा प्रोव्हिजन व नागपूर मार्गावरील टेक्स स्मोकिंग या दुकानात धाड टाकून रामनगर पोलिसांनी विदेशी बनावटीचे २५ ई-सिगारेट व वेब फ्लेव्हर असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला. याप्रकरणी दुकानचालकांवर गुन्हा दाखल झाला. ई- सिगारेट जप्त केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
ई -सिगारेट व वेब फ्लेव्हरवर राज्यात बंदी आहे. मात्र, छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात ई सिगारेटची विक्री होत आहे. या सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी ई- सिगारेटच्या आहारी गेल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. रामनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनगरमधील दुर्गा मंदिरासमोरील निशा प्राेव्हिजन व नागपूर मार्गावरील टेक्स स्मोकिंग या दोन दुकानांत धाड टाकून झडती घेतली असता, अनुक्रमे ६ व १९ असे एकूण २५ ई -सिगारेट आढळून आले. या सर्व ई- सिगारेट्स जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, प्रशांत शेंद्रे, किशोर वैरागडे, विनोद यादव, नीलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, विकास जाधव आदींनी केली.
काय असते ई-सिगारेट?
ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते. ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.
ई-सिगारेटचे कीट आकर्षक
ध्रूमपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अयशस्वी ठरली असून, शाळकरी मुलांमध्ये याचे फॅड वाढले आहे, म्हणूनच ई-सिगारेटचं उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी आहे. तरुणांना ई-सिगारेट कूल वाटते. त्याचे कीट आकर्षक आहे. हे युवावर्गाला आकर्षित करते. ई-सिगारेटमध्ये निकोटिन असते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
शालेय विद्यार्थ्यांना सिगारेटचे व्यसन
चंद्रपुरात शिक्षण घेत असलेली बरीच मुले गांजा, ड्रग पावडर तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या नशेच्या विळख्यात सापडले आहेत. मागणी वाढू लागल्याने काही व्यावसायिक छुप्या मार्गाने या वस्तू चंद्रपुरात आणत आहेत. यातून नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे पेनसारखे दिसते. ती शाळेच्या बॅगमध्ये मुले शाळेत घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.