बापरे! एकाच दिवशी चंद्रपुरात सहा घरफोड्या; १९ तोळे सोन्यासह दागिने लंपास

By परिमल डोहणे | Published: June 15, 2023 12:28 PM2023-06-15T12:28:10+5:302023-06-15T12:29:56+5:30

लाखांची रोकडही गायब

Bapre! Six house burglaries in Chandrapur on a single day | बापरे! एकाच दिवशी चंद्रपुरात सहा घरफोड्या; १९ तोळे सोन्यासह दागिने लंपास

बापरे! एकाच दिवशी चंद्रपुरात सहा घरफोड्या; १९ तोळे सोन्यासह दागिने लंपास

googlenewsNext

चंद्रपूर : कुलूपबंद असलेली तब्बल सहा घरे चोरट्यांनी एकाच दिवशी फोडल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरपासून जवळच असलेल्या दाताळा रोड नवीन चंद्रपूर येथील सिनर्जी वर्ल्ड डाऊनशिप येथे घडली. त्यात जवळपास १९ तोळे सोने, अडीच किलो चांदी व जवळपास दोन लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची तक्रार घरमालकांनी मंगळवारी रामनगर ठाण्यात दिली आहे. काही महिन्यांपूर्वी दुर्गापूर परिसरात बॅंकेत दरोडा पडला होता. एका लग्नातून २० तोळे सोने पळविले होते आता तर चक्क एकाच दिवशी सहा घरफोड्या झाल्याने पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दाताळा रोडवरील कोसारा नवीन चंद्रपूर येथे सिनर्जी वर्ल्ड येथे अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. जवळपास १०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातील काही कुटुंबे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घर कुलूपबंद करून बाहेर गेली होती. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी जय नामदेव, किशोर राऊत, मनोज सिद्धमशेट्टीवार, सिद्धार्थ फुलझेले, मोहम्मद निषाद तसेच अन्य एकाच्या घराचे कुलूप फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडही लंपास केला.

दुसऱ्या दिवशी त्याच वस्तीमध्ये राहणाऱ्या नीलेश मच्चावार यांनी सर्व घरमालकांना घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. सर्वचजण लगेच धावत आले. त्यांनी लगेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागले नसल्याची माहिती आहे. सिनर्जी वर्ल्डमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी एका घरामध्ये हत्या झाली होती. त्या घरात कुणी वास्तव्यास नाही. ते घरसुद्धा चोरट्यांनी फोडल्याची माहिती आहे.

असा मुद्देमाल लंपास

जय नामदेव यांच्या घरून ७० हजार रुपये रोकड, साडेचार तोडे सोने, दीड किलो चांदी, किशोर राऊत यांच्या घरातून चार हजार रोकड, दीड तोळे सोने, पाचशे ग्रॅम चांदी, मनोज सिद्धमशेट्टीवार यांच्या घरून चार हजार पाचशे रोकड, अडीचशे ग्रॅम चांदी, सिद्धार्थ फुलझेले यांच्या घरून ६० हजार रोकड, १२ तोळे सोने, २५० ग्रॅम चांदी, मोहम्मद निषाद यांच्या घरून ३० हजार रोकड, एक तोळे सोने लंपास झाल्याची तक्रार रामनगर ठाण्यात केली आहे.

Web Title: Bapre! Six house burglaries in Chandrapur on a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.