स्वच्छतेसाठी प्रत्येक घरावर ‘बारकोड स्टिकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:20 PM2019-03-02T22:20:48+5:302019-03-02T22:21:01+5:30

शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विविध उपाययोजनांसोबत घरावर बारकोड स्टिकर लावण्यात आले आहे. शिवाय, विविध गाण्याद्वारे स्वच्छतेबाबतचा संदेश दिला जात आहे. ‘गाडी वाला आया घरसे कचरा निकाल... ’ घंटागाडीतून निघणारे सूर शहरातील सर्व वॉर्डांमध्ये ऐकायला मिळत आहे.

'Barcode stickers' on every house for cleanliness | स्वच्छतेसाठी प्रत्येक घरावर ‘बारकोड स्टिकर’

स्वच्छतेसाठी प्रत्येक घरावर ‘बारकोड स्टिकर’

googlenewsNext
ठळक मुद्देगाण्यांद्वारे जनजागृती : नगर परिषदेचा शहरात नावीन्यपूर्ण उपक्रम

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विविध उपाययोजनांसोबत घरावर बारकोड स्टिकर लावण्यात आले आहे. शिवाय, विविध गाण्याद्वारे स्वच्छतेबाबतचा संदेश दिला जात आहे.
‘गाडी वाला आया घरसे कचरा निकाल... ’ घंटागाडीतून निघणारे सूर शहरातील सर्व वॉर्डांमध्ये ऐकायला मिळत आहे. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत हे गीत गुणगुणतांना दिसून येत आहेत. या गीतासोबतच ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने’ व ‘बनेगा बनेगा स्वच्छ इंडिया’ हे गीत हे गीत चर्चेचा विषय ठरले आहे. घरातून कचरा संकलनासाठी भद्रावती न.प.द्वारे १२ वाहनांची खरेदी करण्यात आली. त्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाबाबतची गाणी जनतेपर्यंत पोहचविली जात आहेत.
या प्रणालीद्वारे शहरातील प्रत्येक घरावर एक बार कोड स्टिकर लावण्यात आला आहे. न.प.च्या १२ वाहनांवरील चालकांकडे भ्रमणध्वनी देण्यात आला. सदर मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले. या अ‍ॅपद्वारे कचरागाडी चालकाची उपस्थिती, किती वाजता कामावर हजर झाला, काम केव्हा संपले, हे नगर परिषद प्रशासनाला संगणकाद्वारे माहित होणार आहे.
ज्या घरातून कचरा दिल्या जातो त्याच घराबाहेर लावलेले बारकोड स्टीकर मोबाईल अ‍ॅपद्वारे स्कॅन केल्या जाते. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होणार आहेत. कचरा संकलनाबाबत नियमितता राहिल. ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्यात येतो, याचीही नोंद ठेवली जाणार आहे. घरावर लावण्यात आलेले बारकोड स्टीकर कुणीही काढू नये. शहराच्या विकासासाठी विविध योजना सुरू असताना हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. घंटागाडी येण्यापूर्वी व कचरा उचलल्यानंतरचा संदेश या नवीन यंत्रणेतून प्रशासनाला कळणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी व मुख्याधिकार गिरीश बन्नोरे यांनी दिली आहे.

घनकचरा प्रकल्पस्थळी शाळांच्या सहली
भद्रावती न.प.द्वारे २५ एकर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. त्यात बगिचा तयार करून खेळणी साहित्य लावण्यात आले. कचऱ्याद्वारे खत निर्मिती केली जात आहे. विंडो कम्पोस्टींग, वर्मी कम्पोस्टींग व मशीनद्वारे खत निर्मिती होत आहे. शेतकरी व नागरिकांना हे खत अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले जात आहे. घनकचरा प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले. या जागेवर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कार्यक्रमानंतर भेट म्हणून पॉकेटमध्ये खत देण्यात येते. यातून समाजात विधायक संदेश जात आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत दोन शाळांचे विद्यार्थी उपस्थित झाले. महाविद्यालयील विद्यार्थ्यांनी प्रकल्पाची उपयोगिता जाणून घेण्यासाठी यावे आणि शहराच्या विकासासाठी हातभार लावावे, अशी माहिती नगराध्यक्ष धानोरकर यांनी दिली आहे.

Web Title: 'Barcode stickers' on every house for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.