तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:42+5:302021-05-21T04:28:42+5:30
नवरगाव : सिंदेवाही तालुका धानासाठी प्रसिध्द असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे उन्हाळी धानाचीसुध्दा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात ...
नवरगाव : सिंदेवाही तालुका धानासाठी प्रसिध्द असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे उन्हाळी धानाचीसुध्दा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली असून, आधारभूत धान खरेदी केंद्र बंद असल्याने विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी धानाचे पावसाळी पीकच घेतले जायचे. परंतु अलीकडे तालुक्यातील प्रत्येक गावात तलावाच्या किंवा बोअर, मोटारपंपाच्या माध्यमातून शेतकरी दुबार धानाच्या उत्पादनाकडे वळला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षी धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यापूर्वीच तालुक्यामध्ये उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले होते. मात्र यावर्षी धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले तरीसुद्धा ना नोंदणी ना धान खरेदी अशी स्थिती निर्माण झाली आहे. अधिक मेहनत घेऊन धानाचे उत्पादन घेतले. पण खरेदीच बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे यांनी सिंदेवाही तालुक्यातील सर्व आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली आहे.