कोरोनाकाळात मजुरांना तेंदूपत्ता संकलनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:09+5:302021-05-17T04:26:09+5:30
गतवर्षी बंद होते संकलन सास्ती : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले ...
गतवर्षी बंद होते संकलन
सास्ती : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, तसेच ग्रामीण भागात शेतीची कामेही संपल्यामुळे मजूर व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशातच तेंदूपत्ता संकलन सुरू झाल्याने, ग्रामीण भागातील हातमजुरी करणाऱ्यांना या कोरोनाच्या काळातही आधार मिळाला आहे.
ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने, तसेच कोरोनाच्या काळात इतर व्यवसाय आणि कामे बंद असल्यामुळे मजुरांना रोजगार मिळत नसल्याने अनेकांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राजुरा तालुक्यातील चुनाळा, सातरी, चनाखा, विहीरगाव, पंचाळा, कोहपरा, नलफडी, सिंधी परिसरात अनेक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय २० ते ३० दिवसांचा असतो. सद्यस्थितीत कुठलाही रोजगार नसताना, मात्र ग्रामीण भागातील मजुरांना पोटाची खळगी भरण्याचा आधार तेंदूपत्ता संकलनातून निर्माण झालेला दिसून येत आहे.
बॉक्स
मागील वर्षी होती वाघाची दहशत
मागील काही वर्षांपासून या व्यवसायावर संक्रांतच येत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी या परिसरात वाघाच्या दहशतीमुळे तेंदूपत्ता संकलन होऊ शकले नाही. वनविभागाने त्यांच्या निगराणीत तेंदूपत्ता संकलनाचे काम केले, परंतु त्याचा लाभ अनेकांना घेता आला नाही. तेंदूपत्ता युनिटचा लिलाव वनविभागाद्वारे करण्यात येतो.
बॉक्स
असा चालतो व्यवसाय
साधारणपणे मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होते. भल्या पहाटेच उठून जंगलात जाऊन तेंदूपत्ता पाने तोडून आणायची. जंगलात अनेक वन्यप्राण्यांच्या दहशतीत जिवावर उदार होऊन पोटाची खळगी भरण्यासाठी हे काम करायचे. ही तेंदूपत्ताची पाने घरी आणल्यानंतर दिवसभर संपूर्ण कुटुंब मिळून ती निवडून त्यांचे पुडके बांधताना दिसतात. नंतर सायंकाळी ते फडीवर नेऊन द्यायचे. या कामात घरातील लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच हे काम करताना दिसून येतात. अनेक कुटुंबे यातून बऱ्यापैकी पैसा गोळा करतात. यात शासनाकडून बोनसही दिला जातो.