दोन आठवड्यांनंतर धुवाधार बॅटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:56+5:302021-07-02T04:19:56+5:30
चंद्रपूर : दोन आठवड्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात धुवाधार पाऊस बरसला. चंद्रपुरात सकाळी १० वाजेपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप ...
चंद्रपूर : दोन आठवड्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात धुवाधार पाऊस बरसला. चंद्रपुरात सकाळी १० वाजेपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पर्जन्यमान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक ३६२ मि.मी. सावली तालुक्यात १८३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पेरणी केलेल्या व पेरणीपूर्व मशागतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कडक ऊन निघाल्याने सलग १५ दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. त्यामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होणार याकडे जिल्हावासींचे लक्ष लागले होते. अखेर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने झोडपल्याने पावसाचा वेग यापुढेही कायम राहील, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. गतवर्षीच्या तुलनेत मान्सून पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करणाऱ्या वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती, गोंडपिपरी तालुक्यांतील सोयाबीन व कापूस उत्पादक बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. अंकुर उगविल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी दोन आठवड्यांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारी जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भद्रावती तालुक्यात अत्यल्प पाऊस
जिल्ह्यात १ ते ३० जून २०२१ पर्यंत भद्रावती तालुक्यात सर्वांत कमी १८०.१ मि.मी., तर सर्वाधिक ३६२ मि.मी. पाऊस बल्लारपूर तालुक्यात पडल्याची नोंद आहे. मान्सूनच्या आगमनापासूनच बल्लारपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पर्जन्यमान विभागाने दिली. भद्रावतीनंतर सावली (१८३.५ मि.मी.) पोंभुर्णा तालुक्यातही पावसाचे प्रमाण अत्यल्प (१८३.५ मि.मी.) आहे. या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मशागतीची कामे पावसाची वाट पाहत आहेत. राजुरा तालुक्यातही गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस पडला आहे.
खोळंबलेल्या मशागतीला येणार वेग
ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यांत धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या पिकासाठी मुबलक पाऊस लागतो. शेतकऱ्यांनी नवीन धानाचे वाण खरेदी करून पऱ्हे भरली आहेत. मात्र, धान पिकाच्या दृष्टीने पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीपूर्वीच्या मगाशतीची कामे थांबविली आहेत. पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास खोळंबलेल्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
३० जूनपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)
चंद्रपूर २५३.४
बल्लारपूर ३६२
गोंडपिंपरी ३३१.९
पोंभुर्णा १८३.५
मूल २३४
सावली १८३.३
वरोरा २४३.५
भद्रावती १८०.१
चिमूर २७८.६
ब्रह्मपुरी २०१
सिंदेवाही २४३
नागभीड २४१
राजुरा १८८.८
कोरपना ३३७.३
जिवती २८८.७
एकूण २४९.७