सावधान! ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 05:00 AM2022-06-10T05:00:00+5:302022-06-10T05:00:47+5:30

एक टेक्स्ट मेसेज आला. यामध्ये आपले भरलेले विद्युतबिल अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊपासून आपल्या घरचा विद्युतपुरवठा खंडित करीत असल्याचे नमूद होते. या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी 7908750087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले होते. हा संदेश वीज वितरण विभागाच्या अधिकृत नंबरवरून न येता तो एका खाजगी क्रमांकावर असल्याने तो बनावट असल्याचे प्रा. डाखरे यांना लगेच लक्षात आले.

Be careful! A new funda for online fraud | सावधान! ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा

सावधान! ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपले वीज देयक थकीत असल्यामुळे आपला विद्युतपुरवठा आज रात्रीपासून खंडित करण्यात येणार असल्याचा संदेश पाठवून  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचा नवीन फंडा भामट्यांनी शोधला आहे. या माध्यमातून हे भामटे नागरिकांना गंडा घालण्याच्या तयारीत आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील एका प्राध्यापकासोबत घडला. मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आला.

झाले असे की, शहरातील लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असलेले प्रा. संतोष डाखरे यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. यामध्ये आपले भरलेले विद्युतबिल अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊपासून आपल्या घरचा विद्युतपुरवठा खंडित करीत असल्याचे नमूद होते. 
या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी 7908750087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले होते. हा संदेश वीज वितरण विभागाच्या अधिकृत नंबरवरून न येता तो एका खाजगी क्रमांकावर असल्याने तो बनावट असल्याचे प्रा. डाखरे यांना लगेच लक्षात आले. मात्र भामट्यांची ऑनलाइन फसवणूक करण्याची पद्धती जाणून घ्यायची असल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. 

अशी होते फसवणूक
विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता आपण मागील देयकाचा भरणा केलेला असतानाही तो अपडेट न झाल्याने सिस्टिममध्ये दाखवीत नसल्याचे सांगण्यात येते. संभाषण सुरू असतानाच आपल्याला टीम व्हिएवर (Team viewer)  नामक ॲप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. त्यानंतर ॲप सुरू करण्यास सांगून त्यातील आयडी क्रमांक आपणास विचारला जातो. आपण समोरच्या व्यक्तीस हा आयडी नंबर दिल्यास आपल्या मोबाईलचा ताबा समोरच्या व्यक्तीकडे जातो आणि या माध्यमातून तो बसल्या ठिकाणी तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतो.

भामट्यांनी फोनवरून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे भासवून डाखरे यांनी फसवणुकीची ही पद्धती जाणून घेतली.

शेवटी  डाखरे यांच्याकडून समोरील व्यक्तीला मराठीतून बोलण्याचा आग्रह धरला असता फोन बंद करण्यात आला. दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही घडत आहे. अनेक जण फसवणूकीनंतर तक्रार करत नाही, हेही वास्तव आहे.

 

Web Title: Be careful! A new funda for online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.