सावधान ! बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:00 AM2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:42+5:30
मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.
राजू गेडाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शेतीचा हंगाम सुरू झाला की, बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सक्रिय होतात. शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, या हंगामात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून प्रशासनाने अशा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे.
मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन विविध कंपन्या नकली बी - बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. हे बघता शेतकऱ्याच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना कारवाईचे संकेत दिल्याने बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे. पहिल्या पावसात धानाची पेरणी करण्यासाठी अनेकांची धावपळ होताना दिसणार आहे. मूल तालुक्यात धान लागवडीचे क्षेत्र २२,७८८ हेक्टर असल्याने लाखो रुपयांचे बी - बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हीच संधी साधत मूल तालुक्यात अनेकांनी कृषी केंद्राचा परवाना काढल्याचे दिसून येते. मूल तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र असून लाखो रुपयांचे बी - बियाणे विक्री केले जातात. हीच संधी साधून अनेक कंपन्या आडमार्गाने बोगस बी - बियाणे विकत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत.
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बियाणे बोगस निघाले की, शेतकऱ्याची हंगामात धावपळ सुरू होते. बियाणाची उगवण क्षमता नसल्याने त्याची तक्रार करण्यास वेळ लागतो. त्यामुळे ना कंपनीकडून भरपाई मिळते, ना शेतात पीक उगवते. असे विदारक चित्र निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने कृषी अधिकारी कार्यालयाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गावातील खबऱ्याच्या रुपाने मूल शहरासह तालुक्यातील १११ गावात पाळत ठेवली जात आहे. त्यामुळे बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मूल शहरासह तालुक्यात एकूण ४५ कृषी केंद्र आहेत. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या व चोर मार्गाने विक्री करणारे कृषी केंद्र याकडे कृषी विभागाचे विशेष लक्ष आहे. मूल तालुक्यातील गावागावात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी खबरे ठेवण्यात आले आहेत. यानंतरही बोगस व आडमार्गाने बियाणे विक्री करण्याची माहिती मिळाली तर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.
- भास्कर गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, मूल.