सावधान! कोरोना उद्रेकाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:05+5:30
कोरोनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. विविध किरकोळ व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. मात्र, कोरोनाचा कहर संपणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्णांची संख्या ९६ पर्यंत पोहोचली होती. कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाअधिक चाचण्या वाढविल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्या तरी दररोज रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी ५७ तर गुरुवारी तब्बल ६७ रूग्ण आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली. विशेष म्हणजे, यातील बहुतांश रूग्ण संपर्कातून बाधित झाले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या ७४९ वर पोहोचली. ही संख्या नियंत्रित राहण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा आता कोरोना उद्रेकाच्या उंबरठ्यावर आल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. विविध किरकोळ व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. मात्र, कोरोनाचा कहर संपणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्णांची संख्या ९६ पर्यंत पोहोचली होती. कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाअधिक चाचण्या वाढविल्या. क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढविली. परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी करून गृह व संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले. आता तर अत्याधुनिक अॅन्टिजेन चाचणीही सुरू करण्यात आली. बºयाच नागरिकांची कोरोनाच्या प्रतिकारासह जगण्याची मानसिकता तयार होऊ लागली. परंतु, रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत पुढे आलेल्या पॉझिटिव्हमध्ये संपर्कातून बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी बाधितांची संख्या ७४९ वर पोहोचली. यापैकी ४२६ रूग्ण कोरोना आजारातून बरे झाले. ३२१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
महिनाभरात रूग्ण पुन्हा वाढणार - जिल्हाधिकारी
चाचण्या वाढविण्यात आल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गंभीर आहोत. मात्र, ऑगस्टमध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या बाधितांच्या निरीक्षणानुसार, पॉझिटिव्हच्या घरातील लहान मुले व वृद्धांनाही बाधा झाली आहे. कुणीही लक्षणांची माहिती लपवू नये. बाहेरून आल्यानंतर चाचणी करावी. मास्क हा जीवनाचा अविभाज्य घटक मानावा. उपचाराच्या शेवटच्या टप्प्यात आल्यामुळेच दोन बाधितांचा मृत्यू झाला. माहिती लपविल्यास बिकट स्थिती उद्भवेल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.
‘हाय रिस्क’ व्याधिग्रस्तांमध्ये चिंता
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील नऊ लाख ४१ हजार २२० जणांची आरोग्य तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, ताप व फुफ्फुस आजारांचे रूग्ण आढळले. मधुमेहाचे नऊ हजार १९३ रूग्ण, कर्करोगाचे ३१५ रूग्ण, ताप १११८, सर्दी १४७५, श्वसनाचा त्रास ७४३, उच्च रक्तदाब २३१३५, टीबी ४८३ व हृदयरोगाचे १२१५ असे रूग्ण आढळले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुस आजार या व्याधींनीग्रस्त रूग्ण कोरोनाच्या दृष्टीने ‘हाय रिस्क’ गटात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने अशा रूग्णांमध्येही आता चिंता व्यक्त होवू लागली आहे.
दररोज दीड हजार चाचण्या
कोरोनाचा संसर्ग रोेखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात २५ अधिकाºयांची समिती रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक अधिकाºयाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. सर्व तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करण्यात आला. परजिल्हा व परप्रांतातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कक्ष सुरू केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. या प्रयोगशाळेतून दररोज १ हजार ६०० चाचण्या केल्या जात आहेत.
नियमांची एैसीतैसी
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वच दुकाने सुरू करण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग, नियमित मास्कचा वापर, रस्त्यावर न थुंकणे, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, अशा कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना दिसत आहे.