लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:59+5:302021-07-25T04:23:59+5:30
लग्न ठरलं की प्री-वेडिंग शूट करून घेण्याकडे तरुणाईचा कल दिसून येतोय. परदेशातून आलेला हा ट्रेंड आता आपल्याकडेही चांगलाच रुळला ...
लग्न ठरलं की प्री-वेडिंग शूट करून घेण्याकडे तरुणाईचा कल दिसून येतोय. परदेशातून आलेला हा ट्रेंड आता आपल्याकडेही चांगलाच रुळला आहे. या शूटसाठी ड्रोनचा वापर करण्याचा आग्रह जोडपी धरू लागली आहेत. त्यामुळे लग्नसोहळा, वाढदिवस, साखरपुडा, सण-समारंभ, शोभायात्रा आदीमध्ये ड्रोनचा वापर दिसून येतो. परंतु, नुकत्याच कश्मीरमध्ये एअर फोर्सच्या तळावर ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे ड्रोन वापरण्यावर निर्बंध आले असून कठोर नियमवाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात ड्रोनचा वापर करायचा असल्यास नोंदणीकृत व परवानाधारक ड्रोनचाच वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोर जाण्याचा धोका आहे.
बॉक्स
ड्रोन वापरण्याचे नियम
नागरी उड्डयन मंत्रालयाने देशात उड्डाण करणारे हवाई परिवहनांवर अनेक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध ड्रोनचे वजन आणि आकारानुसार अनेक प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत.
मायक्रो ड्रोन्स उडवण्यासाठी यूएएस ऑपरेटर परमिट १ कडून परवानगी घ्यावी लागेल आणि ड्रोन पायलटला एसओपीचा अवलंब करावा लागेल.
मोठे ड्रोन उड्डाण करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, जर तुम्हाला प्रतिबंधित ठिकाणी ड्रोन उडवायचा असेल तर यासाठी तुम्हाला डीजीसीएची परवानगी घ्यावी लागेल. परवानगीशिवाय ड्रोन उडविणे बेकायदेशीर आहे आणि ड्रोन ऑपरेटरला मोठ्या दंडाच्या शिक्षेची तरतूदही आहे.
बॉक्स
ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे!
नॅनो ड्रोनशिवाय कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यासाठी परवाना किंवा परमिट घेणे आवश्यक आहे. ड्रोनसाठी विद्यार्थी रिमोट पायलट परवाना, रिमोट पायलट परवाना हे दोन प्रकारचे परवाने दिले जातात. दोन्ही परवाने मिळविण्यासाठी ड्रोन ऑपरेटरचे वय १८ वर्षे व जास्तीत जास्त ६५ वर्षे असावे. परवान्यासाठी ऑपरेटर कमीतकमी दहावी पास असणे आवश्यक आहे किंवा दहावीच्या समकक्ष असणे आवश्यक आहे, त्याच्याकडे मान्यताप्राप्त मंडळाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला डीजीसीए स्पेसिफाइड वैद्यकीय परीक्षा देखील पास करावी लागते. परवान्यासाठी आपली पार्श्वभूमी तपासणी केली जाते.
बॉक्स
५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च
पूर्वी टीव्ही सिरीयलच्या शुटिंगसाठी ड्रोनचा वापर व्हायचा मात्र आता प्री वेडिंग किंवा वेडिंग शूटिंग ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे एका सोहळ्यासाठी साधारणत: ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. बहुतेक जण वाढदिवस, सण-समारंभ, शोभायात्रा आदींमध्येसुद्धा ड्रोनचा वापर करतात. किती वेळासाठी ड्रोन वापरण्यात येते त्यावर खर्च अवलंबून आहे.
--------
कोट
जिल्ह्यात लग्नसोहळ्यात ड्रोनचा वापर करण्याचा ट्रेड नाही. काही मोजक्याच ठिकाणी ड्रोनचा वापर केला जातो. रितसर परवानगी घेऊनच पात्रताधारक ड्रेन ऑपरेटरच्या साह्याने शूट केले जाते.
- गोलू बाराहाते, फोटोग्रॉफर असोसिएशन, चंद्रपूर