सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:19+5:302021-08-27T04:31:19+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटातून आता काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर प्रत्येकजण घराबाहेर पडत आहे. मात्र धावपळीमध्ये अनेकांची दररोजची दिनचर्या बदलत ...

Be careful! Lack of sleep also lowers immunity | सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

सावधान! कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

Next

चंद्रपूर : कोरोना संकटातून आता काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर प्रत्येकजण घराबाहेर पडत आहे. मात्र धावपळीमध्ये अनेकांची दररोजची दिनचर्या बदलत आहे. धावपळ करा, मात्र शरीराला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे सध्या गरजेचे असून, पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. झोप आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक विविध समस्या जडण्याची शक्यता असते. यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावते.

कोरोना संक्रमण काळात अनेकांनी रोगप्रतिकार शक्तीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. वर्क फ्रॉम होम असल्याने वेळेवर जेवणासोबतच प्रकृतीकडे प्रत्येकाने विशेष लक्ष दिले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण घराबाहेर पडत आहे. त्याचा परिणाम जेवणासोबतच झोपेवरही होत आहे. रोगप्रतिकार शक्तीसाठी दररोज व्यायाम आणि किमान सात ते आठ तास झोप महत्त्वाची आहे.

बाॅक्स

किमान झोप आवश्यक...

दररोज रात्री ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. जास्त वेळ झोपणे किंवा उशिरा उठणे यामुळे शरीरात आळस निर्माण होतो. आवश्यकतेनुसार झोप न मिळाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात.

पुरेशी झोप घेतल्यानंतरच मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू कार्यक्षम राहू शकतो. त्यामुळे झोपेच्या वेळा सांभाळूनच कामाचे वेळापत्रक करावे.

बाॅक्स

रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराची ढाल

शरीरामध्ये होणारा कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग तसेच ॲलर्जीपासून संरक्षण करण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते. विविध गोष्टींमुळे शरीरात होणाऱ्या रिॲक्शन थांबविण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते. निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. अलीकडे बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप, व्यायाम न करणे यामुळे प्रतिकार शक्तीवर विपरित परिणाम जाणवतो. परिणामी विविध आजार होण्याची शक्यता असते.

बाॅक्स

अपुऱ्या झोपेचे तोटे...

अपुऱ्या झोपेमुळे हृदयाचे विकार, रक्तदान, रक्तातील साखर वाढणे, चिडचिडेपणा, नैराश्य येणे आदी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढतात. झोप कमी होते आणि त्याचे दुष्परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. हे सगळे टाळायचे असेल, तर आपल्या वयाला आवश्यक तेवढी झोप घेतलीच पाहिजे.

बाॅक्स

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

शरीर सुदृढतेसाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. आहारात फळे आणि भाज्यांचा भरपूर समावेश करावा. धान्ययुक्त पदार्थ खाण्यावर भर द्यावा. आहारातील साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करावे. मिठाई, कोल्ड्रिंक्स, फळांचे रेडिमेड रस, एनर्जी ड्रिंक्स शक्यतो टाळावीत. त्याऐवजी फळे खावीत.

जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नयेत. यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होऊ शकतो. शक्यतो घरात तयार केलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करावे.

बाॅक्स

डाॅक्टर म्हणतात...

शारीरिक सुदृढतेसाठी पुरेशी झोप महत्त्वाची असते. यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम करावा. झोप येत नाही म्हणून कोणत्याही प्रकारे औषधींचे सेवन करू नये. झोप न आल्यास आपल्याला आवडतील त्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, वाचन, संगीत याकडे मन रमवावे. यामुळे मन विचलित होणार नाही आणि शांत झोप येईल.

- डाॅ. अशोक वासलवार

हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: Be careful! Lack of sleep also lowers immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.