सावधान! नोकरीसाठी बेरोजगारांना गंडविणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 05:00 AM2021-09-16T05:00:00+5:302021-09-16T05:00:07+5:30
जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. तीन युवकांना नोकरीवर रुजू होण्याचे आदेशही देऊन टाकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याच्या नावावर चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने लाखोेंनी गंडविल्याचे प्रकरण मंगळवारी उजेडात आल्यानंतर अशी एक टोळीच सक्रिय असल्याचा संशय काही बेरोजगार युवकांनी व्यक्त केला आहे. या टाेळीचा तत्काळ शोध घेऊन मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. बनावट स्वाक्षरीप्रकरणी जि.प. ने आज रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने बल्लारपुरातील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. तीन युवकांना नोकरीवर रुजू होण्याचे आदेशही देऊन टाकले. सोमवारी हे युवक जि. प. मध्ये येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. तक्रारीवरून आरोपीविरूध्द भांदवि ४६५, ४६८, ४७९, ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रधार बल्लारपुरातील
ज्या तीन युवकांना नोकरीचे बनावट आदेश देण्यात आले. त्या प्रकरणाचे सर्व सूत्र बल्लारपुरातून हलले. यापूर्वीदेखील काही युवकांना शासकीय नोकरीच्या नावावर गंडवूनही तक्रारी झाल्या नाही. परिणामी, या टोळीची हिंमत वाढल्याची चर्चा आहे. आज जि. प. प्रशासनाने पोलिसात तक्रार केल्याने फसवणूक झालेले बेरोजगार पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने नोकरीचा आदेश देऊन फसवणूक झाल्याची तक्रार जि.प.ला मिळाली. त्या आधारावर आज रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
- श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.