फटाके घेताना सावधान
By admin | Published: October 21, 2014 10:47 PM2014-10-21T22:47:55+5:302014-10-21T22:47:55+5:30
चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही
वस्तीत दुकाने : सुरक्षा साधनांच्या अभावी होऊ शकतो अपघात
चंद्रपूर : चंद्रपुरात आझाद बाग, जटपुरा गेट परिसर, गोलबाजार तसेच प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची दुकाने लागली आहेत. मात्र यातील अनेक दुकानांमध्ये अपघात झाल्यास कोणतेही सुरक्षा साधन नाही. एवढेच नाही तर, अनेकांकडे फटाके विक्रीचा परवाना नसतानाही ते राजरोसपणे फटाके विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत: दक्ष राहून स्वत:ची सुरक्षा स्वत: करणे गरजेचे आहे.
गजबजलेल्या ठिकाणी दुकाने असू नये, हा नियम असतानाही गजबजलेल्याच ठिकाणी फटक्यांच्या दुकानांची आरास मांडली जाते. एवढेच नाही तर, शहरातील काही छोट्या किराणा व्यावसायिकांनी किराणा दुकानात फटाके विक्रीसाठी आणले आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाने पुर्णपणे डोळेझाक केली आहे. गर्दीच्या ठिकाणी स्फोटक पदार्थांची विक्री करू नये, असा नियम असताना चंद्रपुरात मात्र या नियमाला तिलांजली देत शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटून त्याची विक्री केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही याकडे गांभिर्याने बघितले जात नसल्याने शहराची नागरी सुरक्षा धोक्यात आहे.
आझाद बाग परिसरात असलेल्या फटाक्यांच्या दुकानपरिसरात अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणे बंधनकारक असतानाही हा नियम पायदळी तुडविला जात आहे. केवळ एक-दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करून केवळ वाहन पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे सध्यातरी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. याच ठिकाणी नाही तर, शहरातील बहुतांश चौकात फटाक्यांचे दुकान लागले आहे. एखाद्यावेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)