डिजिटल व्हा, पण गं्रथांशी मैत्री मोलाची
By admin | Published: February 14, 2017 12:36 AM2017-02-14T00:36:45+5:302017-02-14T00:36:45+5:30
सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही.
श्याम माधव धोंड : जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन
चंद्रपूर : सध्या तंत्रज्ञानाला खुप महत्त्व आले आहे. त्याच्या प्रभावापासून विद्यार्थी आणि शिक्षणही सुटलेले नाही. इ-बुक वाचा. शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी डिजिटल व्हावे. पण तंत्रज्ञान ग्रंथांना मागे टाकू शकत नाही. ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी केले.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन धोंड यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह होते. मंचावर गोंडवाना साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गारकर, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, डाएटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील आदी उपस्थित होते.
धोंडे म्हणाले की, ग्रंथ सर्वांचे गुरू आहेत. ग्रंथ सखा आहे. माणसांची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या ग्रंथांच्या संख्येवरून मोजली जाते. त्यामुळे डिजिटलायझेशनचे युग आले तरी ग्रंथ आपले महत्त्व टिकवून आहेत. गोंडवाना परिसरात आदिवासी वेगळी भाषा बोलतात. ती बोली स्वरूपात आहे. मुकूंद गोखले यांनी आदिवासी बोलीचा संगणकावर फॉन्ट तयार केला आहे. त्यातून संगणकावर बोलीला भाषेचे स्वरूप आणले आहे. या बोलीला जुन्या काळात चंद्रपूर परिसरात लिपी होती. परंतु काळाच्या ओघात ती नष्ट झाली. बोली भाषेला समृद्ध करीत असते. मी एक १२०० पानांचा ग्रंथ सोबत आणला आहे. हा ग्रंथ प्राकृत भाषेत आहे. ती मराठीपूर्वीची भाषा आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मोल आजही अधिक आहे, असेही स्पष्ट केले. उद्घाटन सत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गारकर, डाएटचे प्राचार्य पाटील यांचे मार्गदर्शन झाले. संचालन बारसागडे यांनी केले. आभार पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची आकर्षक दिंडी
उद्घाटन सत्रापूर्वी मौलाना अबुल कलाम आझाद बाग येथून सकाळी ८.३० वाजता विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान करून अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले. दिंडीमध्ये लेझिम पथकही सहभागी झाले होते. तर सन्मित्र सैनिक शाळेच्या बँड पथकाच्या तालावर दिंडीने आझाद बगिचा, जटपुरा गेटमार्गाने मार्गक्रमण केले. दिंडीचा समारोप ज्युबिली हायस्कूल येथे करण्यात आला. दिंडीमध्ये ज्युबिली हायस्कूल, सिटी कन्या शाळा, हिंदी सिटी हायस्कूल, छोटुभाई पटेल हायस्कूल, एफईएस गर्ल्स हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.