ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाची तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:25+5:302021-02-12T04:26:25+5:30
सावली : डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन व सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास अपेक्षित ध्येय सहज गाठता येते, ...
सावली : डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन व सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास अपेक्षित ध्येय सहज गाठता येते, असा विश्वास सहायक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने पदवी वितरण समारंभ गुरुवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ संगीडवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली, प्रा. इंदोरकर आदी उपस्थित होते. सहायक पोलीस अधीक्षक तारे पुढे म्हणाले, विद्यार्थी जीवनात प्रत्येकांने मन स्थिर ठेवून रागावर नियंत्रण मिळवून परिस्थितीशी तडजोड केली, तर अनुभवास आलेले कटु अनुभवही गोड होतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना समर्थपणे तोंड दिल्यास येणाऱ्या अडचणी चुटकीसरशी संपून जातील, असा विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी मार्गक्रमण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी शैक्षणिक सत्र २०१९-२०२० मध्ये गोंडवाना विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर विद्याशाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. भास्कर सुकारे यांना विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केल्याबद्दल सहायक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली, संचालन प्रा. विनोद बडवाईक, तर आभार डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांनी मानले.