मालडोंगरी येथे झाडावर अस्वलाचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:31 PM2018-02-04T23:31:16+5:302018-02-04T23:31:41+5:30
येथून जवळच असलेल्या मलडोंगरी येथील अगदी मुख्य रस्त्यावरील एका झाडावर रविवारी अस्वलाने आपल्या पिल्लांसह ठाण मांडला.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी: येथून जवळच असलेल्या मलडोंगरी येथील अगदी मुख्य रस्त्यावरील एका झाडावर रविवारी अस्वलाने आपल्या पिल्लांसह ठाण मांडला. याची माहिती होताच अस्वलाला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासानंतर अस्वलाला सुरक्षित जंगलात पाठविण्यात आले.
मालडोंगरी हे गाव ब्रह्मपुरीच्या दक्षिणेस पाच किमी अंतरावर आहे. लागून धामनगाव बिट आहे. या बिटात वनविभागाच्या पाहणीनुसार बिबट, वाघ यांचे वास्तव्य असून अस्वलाचे अस्तित्व नव्हते. मात्र रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालडोंगरीला लागून झोपला मारोती जवळच्या एका मोठ्या झाडावर अस्वल आपल्या पिल्लांसह दिसून आली.
त्यानंतर तेथेच या अस्वलाने ठाण मांडला. धामनगाव मालडोंगरी रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच ही वार्ता ब्रह्मपुरीपर्यंत पोहचली. अस्वलाला पाहण्याकरिता घटनास्थळी लोकांची गर्दी उसळली. मोटर ाायकल, चारचाकी वाहनांची रिघ लागली. लगेच याबाबत उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी आशा चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दीड तासानंतर त्या झाडावरुन अस्वलाला उतरविण्यात यश आले. तोपर्यंत वन कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यापूर्वी याच गावात मादी बिबटने बस्तान मांडले होते.