चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरीमध्ये अस्वलाने मांडले झाडावर ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:55 AM2019-03-20T11:55:26+5:302019-03-20T11:56:09+5:30
घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला.
घोसरी वनपरिक्षेत्रातंर्गत दिघोरी-उपक्षेत्रातील जंगलात बिबट, हरिण व अन्य वनप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत गावालगत शिरकाव करीत आहेत. मंगळवारी सकाळी नांदगाव-गोवर्धन दरम्यान निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजताच्या सुमारास ठाण मांडून बसली. याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच अस्वलाला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्र सहाय्यक अरूण पालीकोंडावार, वनरक्षक राजेंद्र लडके, पी. आर. गुटके, वनकर्मचारी चुधरी, इटेकार, श्रीधर यांच्यासह वनविभगांची चमू घटनास्थळावर दाखल झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलाला पिटाळून लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दरम्यान नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने दिघोरी जंगलाकडे पळ काढला.
अस्वल चक्क जंगलातून गावात आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.