उपजिल्हा रुग्णालय परिसरात अस्वलाचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:33 AM2021-02-05T07:33:05+5:302021-02-05T07:33:05+5:30
मूल : येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिसरात पिसाळलेल्या अस्वलाचा वावर वाढला असून, चरखा संघ व उपजिल्हा रुग्णालयात भीतीचे वातावरणात पसरले ...
मूल : येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिसरात पिसाळलेल्या अस्वलाचा वावर वाढला असून, चरखा संघ व उपजिल्हा रुग्णालयात भीतीचे वातावरणात पसरले आहे. या संदर्भात येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.उज्ज्वल इंदुरकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांना पत्र देऊन अस्वलाची भीती दूर करण्याची मागणी केली आहे.
मूल शहरात बफर व नॉन बफर ही दोन्ही वनविभागाची कार्यालये असून, अस्वलचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मागील वर्षी कर्मवीर महाविद्यालय परिसरात दोन पिल्लासह अस्वल फिरत होती. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. कर्मवीर महाविद्यालयातील खेळाच्या मैदानावर फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली होती. त्यावेळी वनविभागाने पाळत ठेवून अस्वलाला हाकलून लावले होते. या एक-दोन दिवसांत अस्वल चरखा संघ परिसरात फिरताना अनेकांनी बघितले आहे. सदर अस्वल हे उपजिल्हा रुग्णालयातही आल्याचे अनेकांनी बघितले आहे. उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण रात्रीच्या वेळी ये-जा करीत असतात. अस्वल पिसाळलेले असल्याने भीती पसरली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वैद्यकीय अधीक्षक डाॅ.उज्जल इंदूरकर यांनी केली आहे.