दहा कोटींचे सौंदर्यीकरण गेले पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:48 PM2018-07-22T22:48:54+5:302018-07-22T22:49:22+5:30
मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : मध्य चांदा वनविभागातर्फे अंमलनाला धरणावर अंमलनाला पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याकरिता दहा कोटी रूपये खर्च करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र प्रारंभीच काम पाण्यात बुडाल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरपना तालुक्यासह जिवती तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने अंमलनाला धरण शंभर टक्के भरला. दोन वर्षांनंतर वेस्टवेअरवरून पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे आजमितीला येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
अंमलनालाकडे पर्यटकांचे वाढते आकर्षण बघता, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये अंमलनाला पर्यटन क्षेत्राच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन आमदार संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले. मात्र पहिल्याच पावसात संपूर्ण सौंदर्यीकरणाचे काम पाण्याखाली आले आहे.
जवळपास दोन हेक्टर जागेमध्ये सुरू असलेल्या या कामाच्या जागेवर पूर्णपणे पाणी साचले असून संरक्षण भिंत पाण्याखाली आली आहे. अनेक कंत्राटदारांच्या माध्यमातून येथे वेगवेगळी कामे सुरू असून चुकीच्या नियोजनामुळे शासनाचा निधी व्यर्थ जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
वनविभागाने निवडलेल्या अभियंत्यांनी अभ्यासपूर्ण क्षेत्र न निवडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करण्याकरिता मुबलक जागा आहे. तरीही अगदी अंमलनाल्याला लागून पाण्याच्या जवळ काम केल्याने शासनाला दरवर्षी देखभाल-दुरुस्तीचा मोठा खर्च करावा लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे आजघडीला या ठिकाणी संपूर्ण दलदल झाल्याने सौंदर्यीकरणाचे काम करता येणे शक्य दिसत नाही.
शासनाने या गंभीर बाबीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन जागा निवडीबाबत फेरविचार करावा व केलेला खर्च लोकहिताचा व्हावा, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रोप-वेच्या खाली प्रवेशद्वार
दहा कोटींचे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून माणिकगड सिमेंट कंपनीचे रोप-वे आहे. ऐन रोप-वे असलेल्या ठिकाणी बगीचाचे प्रवेशद्वार तयार करण्यात येत असून नागरिकांना जोखीम पत्करून रोप-वेच्या खालून बगीचामध्ये जाण्याची वेळ येणार आहे. रोप-वे मधील चलनामधून छोटे दगड पडून डोक्याला सुद्धा इजा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.