मधुमक्षिका पालन हे अन्न व रोजगार निर्मितीसाठी पूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:28+5:302021-02-17T04:33:28+5:30
सुनील पोकरे : मधुमक्षिका पालन व प्रशिक्षण शिबिर वरोरा. मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून परागीकरणासोबतच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळून देशासमोरील ...
सुनील पोकरे : मधुमक्षिका पालन व प्रशिक्षण शिबिर
वरोरा. मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून परागीकरणासोबतच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळून देशासमोरील अन्न व रोजगाराचे प्रश्न निकाली निघू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणेचे सहसंचालक सुनील पोकरे यांनी केले.
महारोगी सेवा समितीद्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा व भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणाच्या उद्घाटकीय सत्राला प्रमुख अतिथी म्हणून भारत समाज प्रबोधन संस्था वरोराचे अध्यक्ष विनायक तराळे उपस्थित होते. शिबिराचे प्रशिक्षक म्हणून डॉ. तात्यासाहेब धानोरकर यांनी शिबिराची पूर्व पीठीका मांडली. त्यात त्यांनी मधमाशीचे प्रकार, व्यवस्थापन, मधाचे उपयोग तथा विविध पदार्थांचा ओझरता आढावा घेतला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी मधुमक्षिका पालनाच्या व्यावसायिकपणाची गरज व्यक्त करीत भविष्यात महाविद्यालय प्रशिक्षणार्थीच्या पाठीशी संसाधन केंद्र म्हणुन उपस्थित राहील, याबाबत आश्वस्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन गजबे यांनी करून शिबिराच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. संचालन राहुल तायडे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. सुहास पोतदार यांनी केले.