विषय शिक्षक पदस्थापनेला सुरुवात
By admin | Published: June 7, 2017 12:45 AM2017-06-07T00:45:12+5:302017-06-07T00:45:12+5:30
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळांमध्ये बऱ्याच दिवसांपासून विषय शिक्षक पदस्थापनेचा घोळ सुरू होता.
तीन दिवस चालणार प्रक्रिया : सीईओ व इओंची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळांमध्ये बऱ्याच दिवसांपासून विषय शिक्षक पदस्थापनेचा घोळ सुरू होता. हा घोळ आता संपलेला असून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या उपस्थितीत सोमवारपासून विषय शिक्षण शिक्षक पदस्थापनेला सुरुवात झाली.
तत्पूर्वी शिक्षण विभागाच्या पत्रानुसार विषय शिक्षक पदस्थापनेची तारीख ही १ ते ३ जून ठरली होती. परंतु काही कारणाने ही तारीख रद्द करुन सोमवारपासून ही प्रक्रिया सुरु केली. अनेक शिक्षकांना ही तारीख सुद्धा रद्द होईल असे वाटत होते. मात्र सीईओ आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी स्वत: उपस्थित राहून पदस्थापनेची प्रक्रिया यशस्वीरित्या राबविल्यामुळे शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विज्ञान विषयाच्या ५८० मान्य पदे असताना फक्त ७९ शिक्षक कार्यरत होते. यात जवळपास ५०४ जागा रिक्त होत्या. पदस्थापनेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र जीवती तालुक्यामध्ये जाण्यासाठी काही शिक्षकांनी नकार दिल्यामुळे पुन्हा जीवती तालुक्यातील शाळांमध्ये विज्ञान विषयाच्या काही जागा रिक्त आहेत. सोमवारला पदस्थापनेची प्रक्रिया ९ वाजता सुरु झाली ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालली. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राम गारकर यांनी सुरुवातीलाच शिक्षकांना काही मौखीक सूचना दिल्या. त्यानुसार पदस्थापने दरम्यान काही शिक्षक बीएससी नसतानाही त्यांची नावे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत आली होती. मात्र काही शिक्षकांनी आपण विज्ञान शिक्षकासाठी पात्र नसून आपले नाव चुकीचे आल्याचे सांगितले. तर काही शिक्षकांनी बारावी विज्ञान किंवा बीएससी नसतानाही असल्याचे सांगितले होते. मात्र अशाचे मूळ कागदपत्र तपासल्यानंतर त्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले. एकंदरीत बऱ्याच दिवसांपासून शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या समस्यापैकी एक समस्या दूर करण्यात नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी पापडकर यांना यश आले आहे.
शिक्षकांत ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण
काही शिक्षकांना चांगल्या जागा मिळाली आहे. तर काही कार्यरत पद शिक्षकांना आपली जुनी शाळा सोडावी लागत असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीची कुजबुज सुरु होती.
आज भाषा, उद्या सामाजिक शास्त्र विषयाची पदस्थापना
उद्या ७ जूनला भाषा विषयाची पदस्थापना समुपदेशनाद्वारे होत आहे. भाषा विषयाची मान्य पदे ५६८ असून ३९३ पदे कार्यरत असून जवळपास १८० पदे रिक्त आहेत. या विषयासाठी पदस्थापनेची प्रक्रिया नव्यानेच राबविण्यात येत असल्याने ११३० शिक्षक भाषा विषयासाठी उद्या उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यानंतर ८ जूनला सामाजिक शास्त्र या विषयाची पदस्थापना होणार आहे.