बंडू धोत्रे यांचा अन्नत्याग सत्याग्रह मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:24 AM2021-03-07T04:24:17+5:302021-03-07T04:24:17+5:30
चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य ...
चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तहसीलदार नीलेश गौंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबूपाणी पाजून बंडू धोत्रे यांचे उपोषण सोडले.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिलेत. रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दोन टप्प्यांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली. रामाळा तलाव खोलीकरणबाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असून, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना सादर करण्यात आला आहे.
खोलीकरणाबाबत पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने, विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करून भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
कोट
रामाळा तलावाचा प्रश्न घेऊन इकोप्रोने हाक दिली आणि सर्वसामान्य जनतेनी साथ दिली. हा लढा केवळ इको-प्रोचा नव्हता, तर तो जनतेचा होता. १२व्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने अन्नत्याग सत्याग्रह मागे घेत आहे. आता तलाव संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने सत्याग्रह सुरू होणार आहे, त्याला चंद्रपूरकर नागरिकांची अशीच साथ हवी आहे.
- बंडू धोतरे, अध्यक्ष, इको प्रो